रूट मोबाईलच्या विजयात गोलंदाजी जोडी असिफ शेख-हितेश परमार चमकली 

४८ व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी रूट मोबाईलने डीएमसीसीवर एकतर्फी सामन्यात सात गडी राखून विजय नोंदवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय डीएमसीसीने घेतला. परंतु हा निर्णय चुकीचा ठरला कारण त्यांचे फलंदाज फार काही योगदान करू शकले नाही. ते झटपट मैदानावर आले आणि गुणविश्लेषकाला जास्त काही त्रास न देता तंबूत परतले.

२५.१ षटकात डीएमसीसी संघ केवळ ९३ धावा करून सर्वबाद झाला. रूट मोबाईलच्या आसिफ शेख (४/२०) आणि हितेश परमार (४/२२) यांनी प्रत्येकी चार विकेट्स घेत डीएमसीसीला एका मागोमाग एक धक्का दिला. शेख आणि परमार यांनी प्रत्येकी सात षटके म्हणजेच ४२ चेंडू टाकले ज्यात ३२ डॉट बॉल्सचा समावेश होता.

दुसरीकडे, रोनीत ठाकूर हा डीएमसीसीसाठी दुहेरी अंकात धावा करणारा एकमेव फलंदाज होता. ठाकूर ७२ चेंडूत ३६ धावा करून नाबाद राहिला.

विजयासाठी ९४ धावांचे माफक लक्ष्य असताना, रूट मोबाइलने केवळ १२.२ षटके घेत औपचारिकता पूर्ण केली. अथर्व काळेने २० चेंडूत पाच षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या आणि सलामीवीर उमेश गुर्जर (१५ चेंडूत २० धावा) आणि कर्णधार आयुष वर्तक (१८ चेंडूत नाबाद २२) यांची चांगली साथ त्याला लाभली. त्यादरम्यान, काळे आणि वर्तक यांनी उत्कृष्ट फटकेबाजी करून चौथ्या विकेटसाठी अवघ्या ३७ चेंडूत ६१ धावांची भागीदारी केली आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला.

रूट मोबाईलच्या पडलेल्या तीन विकेट्सपैकी डीएमसीसीच्या हेरंब परबने (२/२५) घेतल्या दोन तर ठाकूरने (१/१७) पटकावली एक.

 

संक्षिप्त धावफलक: डीएमसीसी २५.१ षटकांत सर्वबाद ९३ (रोनित ठाकूर ३६ नाबाद; असिफ शेख ४/२०, हितेश परमार ४/२२) पराभूत विरुद्ध रूट मोबाइल १२.२ षटकांत ९४/३ (अथर्व काळे ३७ नाबाद; हेरंब परब २/२५)

सामनावीर: असिफ शेख, रूट मोबाईल