ठाणे: महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा स्व. शि.म.परांजपे स्मृती पुरस्कार यंदा ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांना जाहीर झाला आहे.
मिलिंद बल्लाळ यांनी संपादक म्हणून गेली अनेक वर्षे ठाणेवैभवच्या माध्यमातून परखड भाष्य करतानाच शहराच्या सर्वांगीण विकासात विविध उपक्रमांच्या माध्यमातून योगदान दिले आहे. साहित्य क्षेत्रही त्यांचे मोठे योगदान असून याची दखल घेत महाराष्ट्र संपादक परिषदेने त्यांना स्व. शि.म.परांजपे स्मृती पुरस्कार जाहीर केला आहे.
रोख रक्कम, सन्मान चिन्ह, आणि महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप असून शनिवार ४ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र आवटी उपस्थित राहणार आहेत.
या समारंभात झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार, दैनिक संध्याकाळच्या संपादक रोहिणी खाडिलकर आदी मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.