सारस्वत बँकेने टाइम्स ऑफ इंडियाचे खाते केले बंद

संकेत कदमच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सारस्वत बँकेने बुधवारी ४८ व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर टाइम्स ऑफ इंडियाला पाच गडी राखून पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना टाइम्स ऑफ इंडियाचा संघ २४.५ षटकांत ९० धावांवर बाद झाला. कर्णधार शेखर कदम (४७ चेंडूत ३२ धावा) आणि अमेय महांबरे (२१ चेंडूत १० धावा) ही सलामी जोडी सोबतच श्रवण भोसले (४८ चेंडूत नाबाद ३७ धावा) यांनी टाइम्स ऑफ इंडियासाठी दुहेरी अंकी धावा केल्या. सारस्वत बँकेचा कदम जरी बऱ्याच उशिरा गोलंदाजी करायला आला असला तरी त्यानी त्याची पहिली विकेट काढायला जास्त वेळ लावला नाही. ४.५ षटकांत फक्त ११ धावा देऊन त्यानी सात गडी बाद केले आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या फलंदाजीचे कंबरबे मोडले.

अवघ्या ९१ धावांचा पाठलाग करताना सारस्वत बँकेने १९.१ षटकांत पाच गडी राखून लक्ष्य गाठले. सलामीवीर मृणाल तोडणकर (३३ चेंडूत २१ धावा) आणि राजेश साबळे (४६ चेंडूत नाबाद २५ धावा) यांनी धावांचा पाठलाग करताना मोलाचे योगदान दिले. टाईम्स ऑफ इंडियाच्या पंकज सावंतने दोन गडी (२/१६) बाद केले आणि त्याच्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक: टाइम्स ऑफ इंडिया २४.५ षटकांत ९० सर्वबाद (श्रवण भोसले नाबाद ३७ धावा; संकेत कदम ७/११) पराभूत वि. सारस्वत बँक (राजेश साबळे नाबाद २५ धावा; पंकज सावंत २/१६)