सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डमध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. पहिल्या फेरीत सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूलचा पराभव केल्यानंतर, सेंट जोसेफ्स हायस्कूल डोंबिवलीने हॅरिस शिल्डच्या दुसऱ्या फेरीत बालमोहन विद्या मंदिर दादर (इंग्रजी माध्यम) संघाचा १० गडी राखून पराभव केला.
क्रॉस मैदानावर प्रथम गोलंदाजी करताना सेंट जोसेफ्स हायस्कूलने बालमोहन विद्या मंदिराला २६.३ षटकांत १०८ धावांत गुंडाळले. वेगवान गोलंदाज इंद्र मिश्रा याने उत्कृष्ट नियंत्रणासह गोलंदाजी करून बालमोहनच्या फलंदाजीची पाठ मोडली. एका क्षणी स्कोअरबोर्ड वर होते २७ धावा आणि ४ खेळाडू बाद. बालमोहनच्या फलंदाजांनी जरी भागीदारी करायचा प्रयत्न केला तरी फिरकी गोलंदाज आर्य सागरे (२/२१) आणि आयुष आंबेकर (४/१४) यांनी त्या फलंदाजांच्या भोवती जाळे रचले आणि सहा विकेट्स पटकावल्या.
नंतर, सेंट जोसेफ्स हायस्कूलचा कर्णधार आयुष आंबेकर (५४*) याने आपला फॉर्म कायम ठेवत शानदार नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचा सलामीचा जोडीदार विहान वाघ (३३) याने शांत आणि संयोजित खेळी खेळली आणि या जोडीने त्यांच्या शाळेला १० गडी राखून विजय मिळवून दिला.