शहापूरचा दूध उत्पादक शेतकरी संपाच्या मैदानात
शहापूर: वाढत्या महागाईने पशुखाद्य आणि चाऱ्याचे दर गगनाला भिडले असतांना दुधाच्या खरेदी दरात अपेक्षित वाढ होत नसल्याने शहापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. दुग्ध व्यवसायातील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी १७ ऑक्टोबरपासून डेअरी मालकांना दूध न देण्याचा बेमुदत संप पुकारला आहे.
दूध उत्पादक शेतकरी सामाजिक संस्था, शहापूर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनाबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. दुधाला रास्त आणि किफायतशीर दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन दुग्ध व्यवसाय आहे. मात्र गेल्या काही काळात पशुखाद्य, वैरण आणि चाऱ्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. दुभत्या गायी- म्हशींची खरेदी, त्यांचा सांभाळ, औषधोपचार आणि इतर दैनंदिन खर्चही वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. दुसरीकडे या वाढत्या खर्चाच्या तुलनेत दुधाच्या खरेदी दरात समाधानकारक वाढ होत नसल्याने दूध उत्पादकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी, दुग्ध व्यवसाय टिकवायचा कसा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान खर्च वाढला, उत्पन्न घटले मग दुग्ध व्यवसाय करायचा कसा असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
हा संप शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने सुरू करण्यात आला असून, दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ते सहकार्य करावे, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. दुधाच्या दरात समाधानकारक वाढ होईपर्यंत डेअरींना दूध न देण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. यावेळी दूध उत्पादक शेतकरी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मारुती धिर्डे, उपाध्यक्ष दत्तात्रय डिंगोरे, सल्लागार ॲड. प्रकाश ठाकरे, राजेश भोईर, जयवंत घरत आणि किशोर घरत यांच्यासह तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.