विजयादशमी अर्थात दसऱ्याचा भारतीय समाज जीवनात बहुपेडी अर्थ आहे. या दिवसाचे महत्त्व पौराणिक कथांतून, धार्मिक आणि आता तर राजकीय संदर्भांमुळे विविध पातळींवर अधोरेखित होऊ लागले आहे. तत्वज्ञानाच्या अंगाने विचार केला तर पांडवांचा वनवास, पुढे एक वर्षाचा अज्ञातवास, कौरवांवर मिळवलेला विजय, शमीच्या झाडावर लपवलेली शस्त्रे आदींचा विचार केला तर त्यातून असंख्य रुपके तयार होतात आणि त्यांची संगती आजच्या घडामोडींशी लावली तर दसरा हा शुभारंभ आणि सोन्याच्या पानांची देवाणघेवाण यापलिकडे जातो.
आजच्या युगात, विशेषत: सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या नेमके कोण कौरव आणि कोण पांडव हे ठरवणे खूपच सापेक्ष झाले आहे. तसेच राजकीय नेते या दिवसाचे औचित्य साधून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन करीत असतात, ज्याला ते विचारांचे सोने लुटणे असेही म्हणत असतात. प्रत्यक्षात सोन्याचा भाव गगनाला भिडला असताना तो सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे विचारांना सोन्याचा मुलामा देणे तसे सोपे राहिलेले नाही. मुळात ज्याला सोन्याची झळाळी प्राप्त व्हावी अशा विचाराचा मूळ धातूच भारतीय राजकारणातून हद्दपार झाला आहे. या नेत्यांकडे शमीची झाडे आहेत काय, त्यावर त्यांनी शस्त्रे दडवून ठेवली आहेत काय, त्या शस्त्रांना कौरव-वृत्तीवर विजय मिळवण्याइतकी धार राहिली आहे काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणवणारे दोन निवडणुकीदरम्यान सुमारे चार वर्षे अज्ञातवासात असतात, अशा नेत्यांकडून विजयोत्सवाची अपेक्षा ती काय बाळगणार? त्यांच्या या प्रवृत्तीमुळे मतदार त्यांचे बोथट झालेले मताचे शस्त्र वापरण्यापेक्षा विकण्यात धन्यता मानू लागले आहेत आणि एकदा का हा पंचवार्षिक व्यवहार झाला की तेही वनवास घेऊन मोकळे होतात. थोडक्यात, अज्ञातवास आणि वनवास यामध्ये लोकशाहीचे महाभारत अडकले आहे. असो. अलिकडे सरकाविरुद्ध आंदोलने वाढीस लागली आहेत. आंदोलक हे स्वत:ला पांडव समजत आहेत. परंतु राज्यकर्ते तसे मानायला तयार नाहीत कारण ते स्वत:ला कौरव मानायला तयार नाहीत. कोणाला काय ठरवायचे हे जनतेच्या हाती आहे. परंतु तुर्तास त्यांच्या अंगणातली शमीची झाडे विकास प्रकल्पांत कापली गेली असावीत आणि त्यामुळे शस्त्रे चोरीला गेल्याचा सोयीचा युक्तीवाद त्यांच्यापैकी अनेक करीत असावेत. या सर्व भानगडीत महाभारताचा हा निर्णायक अध्याय शेवटच्या शोधात अधांतरी झाला आहे. आपण या अधांतरी भारताचे नागरिक आहोत आणि शमीच्या झाडाकडून प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आता आपण रुपकाकडे वळू या, म्हणजे जेणेकरुन आतापर्यंत झालेल्या चुकांचे सीमोल्लंघन करण्यास आपल्या पुरता आपण विचाराचे सोने तयार करू शकू! शमीचे नैसर्गिक रुपक: हे झाड वाळवंटात किंवा पाण्याचे दुर्भिक्ष (जे आजच्या परिस्थितीला लागू होते) असलेल्या भागातही स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवते. पाण्याचा शोध घेत जमिनीखाली खोलवर जाणे याचा अर्थ पीकपाणी असाही निघू शकतो किंवा ज्ञानाची भूक शमवणे त्याअर्थी सुद्धा!
तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर माणसाने संकटसमयी (दुष्काळ) खचून न जाता आपली आत्मिक मूल्ये आणि आंतरिक शक्ती घट्ट ठेऊन संघर्ष केला पाहिजे.पौराणिक संदर्भात वेदांमध्ये शमीच्या लाकडात ‘अग्नी’वास करतो असे मानले जाते. यज्ञासाठी शमीच्या समीधा वापरल्या जातात. अग्नीचे रुपक म्हणजे माणसांच्या आतही ऊर्जेचा आणि ज्ञानाचा अग्नी सुप्त अवस्थेत असतो. तो योग्य प्रयत्नांनी (मंथनाने) प्रज्वलित करता येतो. शस्त्रांचे रुपक म्हणजे कठीण काळात माणसाला अनेकदा आपली शक्ती, कौशल्य आणि अंहकार बाजूला ठेवावा लागतो, जसा की तो पांडवांनी शमीच्या झाडावर लपवून ठेवला होता!
सांस्कृतिक संदर्भाचा विचार करताना ‘शमी शमयते पापम्’ हा श्लोक मनात येतो. पापांचे आणि संकटांचे शमन करण्याचा संदेश या रुपकात दडला आहे. शमीच्या झाडाचा संबंध शनीदेवाशी जोडला जातो. शनी हा कर्माचे फळ देतो आणि शिस्तही शिकवतो. शमीची पूजा म्हणजे कर्माची शुद्धी करणे आणि मनातील नकारात्मकता नष्ट करुन शांतता स्वीकारणे असा व्यापक अर्थही काढता येऊ शकेल.
तात्पर्य, दसऱ्याचा अर्थ सणापलिकडे आहे आणि त्याचा विचार सर्वांनीच करायला हवा. बाकी प्रत्येक मानवात विचारांची खाण असते, त्यातून सोने आपण आपलेच निवडून घ्यायचे असते. हे सोने विकण्यापेक्षा त्यातून विवेकाचे अलंकार घडवणे हाच खरे तर आपण आपल्यावर विजय मिळवण्यासारखे होते!