शहापूर: क्रिकेट क्षेत्रात आपल्या मेहनतीच्या जोरावर ठसा उमटवणाऱ्या रिअल टॅलेंट क्रिकेट अकॅडमीच्या तीन प्रतिभावान खेळाडूंची इंडिया-कॅनडा क्रिकेट मालिकेसाठी निवड झाली आहे.
शहापूरमधील बाबू फरारा, प्रणित खांजोडे आणि राजेंद्र दळवी या तीन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले क्रिकेट कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. या निवडीमुळे प्रशिक्षक वैभव हिलम अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
इंडिया-कॅनडा क्रिकेट मालिका कॅनडातील टोरोन्टो शहरात आयोजित करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये या तिघांचा समावेश आहे. या मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याने या खेळाडूंना आपल्या कामगिरीच्या माध्यमातून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेण्याची महत्वपूर्ण संधी उपलब्ध होणार आहे. या तिन्ही खेळाडूंच्या निवडीमागे त्यांची मेहनत, जिद्द, नियमित सराव आणि क्रिकेटप्रती असलेली निष्ठा महत्वाची ठरली आहे.
रिअल टॅलेंट क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक वैभव हिलम यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी आपल्या कौशल्यात सातत्याने सुधारणा केली. त्यांच्या या यशामुळे योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर ग्रामीण भागातील खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेऊ शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.