साडेसात कोटी खर्चूनही पडू लागले प्लास्टर
ठाणे: नौपाड्यातील गावदेवी भाजी मार्केट आणि प्रभाग समिती कार्यालयाच्या नूतनीकरणावर महापालिकेने तब्बल साडेसात कोटी रुपये खर्च केले असून ओटले, शौचालये, खिडक्या-दरवाजे यांच्यावर प्रशासनाने पैशांची मुक्तहस्ते उधळण केली आहे. धक्कादायक म्हणजे इतका खर्च करूनही काही दिवसांपूर्वीच लोकार्पण झालेल्या या नूतन मंडईच्या प्रवेशद्वारावरील प्लास्टर पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
२१ मे रोजी लागलेल्या भीषण आगीत गावदेवी मार्केटचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला, तर १५० हून अधिक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. गावदेवी मंडई बांधल्यापासून येथील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यामुळे पूर्णपणे जळून खाक झालेल्या मार्केट आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती कार्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले. आगीत नुकसान झालेल्या इमारतीची दुरुस्ती, व्यापाऱ्यांसाठी ओटले आणि अग्निसुरक्षा यंत्रणा उभारणे आवश्यक होते. मात्र, या कामांसाठी झालेला खर्च थक्क करणारा असल्याची आकडेवारी समोर आली आहे. प्रवेशद्वारावरील प्लास्टर पडल्याची घटना घडल्यानंतर नूतनीकरणाच्या कामांचे अंदाजपत्रक, प्रत्यक्ष खर्च आणि गुणवत्ता तपासणी यांचा हिशेब तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
मार्केटच्या तळमजल्यावरील चारही बाजूंचे ओटले बांधण्यासाठी एक कोटी ७८ लाख ८१,३८० रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. पश्चिम बाजूच्या ओटल्यांसाठी ४५ लाख ४७,६४१ रुपये, तर उत्तर, पूर्व आणि दक्षिण बाजूंच्या ओटल्यांसाठी प्रत्येकी ४४ लाख ४४,५९५ रुपये खर्च करण्यात आले. भाजी विक्रेत्यांसाठी ओटले बांधणे आवश्यक असले, तरी प्रत्येक बाजूच्या कामासाठी सुमारे ४४ ते ४५ लाख रुपये खर्च झाले आहे. म्हणजे एका ओटल्यासाठी एक लाख ४५ हजाराच्या आसपास खर्च करण्यात आला आहे.
प्रभाग समिती कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील दरवाजे आणि खिडक्या बदलण्यासाठी ३८ लाख ९९६४ रुपये, तर दुसऱ्या मजल्यावरील याच कामासाठी तेवढाच खर्च करण्यात आला. दोन्ही कामांचा एकत्रित खर्च ७६ लाख १९,९२८ रुपये आहे, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंडईमध्ये असलेल्या दोन शौचालयांसाठी 47 लाख,
तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील शौचालयांचे नूतनीकरण व प्लंबिंगसाठी ४७ लाख ८५६० रुपये खर्च झाले. इमारतीच्या बाहेरील प्लास्टर, रंगरंगोटी आणि अन्य कामांसाठी ५० लाख ८०,४२० रुपये खर्च दाखवण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे बाजूचे गटार बांधण्यासाठी ४५ लाख १४,९०१ रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. गटार बांधण्यासाठी कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
आगीनंतर इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा उभारण्यात आली. मुख्य अग्निप्रतिबंधक यंत्रणेवर ६१ लाख १४,१८२ रुपये, फायर वॉटर टँक, मीटर रूम आणि कंट्रोल पॅनेलवर २२ लाख २१,५०७ रुपये, तर स्मोक डिटेक्शन आणि फायर अलार्म यंत्रणेवर १९ लाख ७४,०२४ रुपये खर्च झाल्याचे नमूद आहे. या तीन कामांवर मिळून एक कोटी तीन लाख ९७१३ रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय मुख्य विद्युत पॅनेल, तळघर व तळमजल्यावरील विद्युतीकरण आणि डक्टिंगच्या चार कामांवर सुमारे एक कोटी ३९ लाख ९५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे.
नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी गावदेवी मार्केटच्या प्रवेशद्वारावरील प्लास्टर पडले. त्यामुळे कामांची गुणवत्ता आणि त्यावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. प्लास्टर पडण्यामागचे नेमके कारण तांत्रिक तपासणीतून स्पष्ट होईल; मात्र, नव्याने नूतनीकरण केलेल्या इमारतीत अशी घटना घडल्याने कामांची तपासणी योग्य प्रकारे झाली होती का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.