मुंबई : सर्व खेळाडूंनी दिलेल्या योगदानामुळेच भारताला जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकता आले, असे मत या संघाचे प्रशिक्षक आणि न खेळणारे कर्णधार अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी मेरी अॅन गोम्सच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
भारताला यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले. अंतिम फेरीत भारताला रशियाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. मात्र, भारतीय संघाने कोनेरू हम्पीसारखी आघाडीची खेळाडू नसतानाही मिळवलेल्या यशाचा कुंटे यांना अभिमान आहे. युरोपीय देशांत कोव्हिशिल्ड लशीला प्राधान्य असल्याने कोव्हॅक्सिन लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या हम्पीला व्हिसा मिळवण्यात अडचण आली. पद्मिनी राऊतलाही याच समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे स्पर्धेला तीन दिवस शिल्लक असताना मेरीची भारतीय संघात निवड झाली.
‘‘मेरी साखळीत केवळ तीन सामने खेळली. मात्र, तिने उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानविरुद्ध दोन्ही सामने जिंकले. तसेच उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यातही तिने विजय मिळवला. मात्र, आमच्या या यशात प्रत्येकच खेळाडूची महत्त्वाची भूमिका होती,’’ असे कुंटे यांनी सांगितले.
‘‘द्रोणावल्ली हरिकाने सर्व ११ सामने खेळले. भक्ती कुलकर्णी साखळीत चांगली खेळली. उपांत्य फेरीत तानिया सचदेवने निर्णायक विजय मिळवला,’’ असे कुंटे म्हणाले.
बुद्धिबळपटूंचा अर्जुन पुरस्कारासाठी विचार व्हावा – भक्ती कुलकर्णी
भारतीय बुद्धिबळपटूंनी मागील काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मागील ‘फिडे’ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने संयुक्त विजेतेपद पटकावले होते, तर यंदा या संघाने कांस्यपदक जिंकले. तसेच जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतही भारताला पहिल्यांदा पदक जिंकता आले. त्यामुळे बुद्धिबळपटूंचा पुन्हा अर्जुन पुरस्कारासाठी विचार झाला पाहिजे, असे भक्ती कुलकर्णीला वाटते. २०१३ नंतर बुद्धिबळपटूंना अर्जुन पुरस्कार न मिळाल्याची खंत तिने व्यक्त केली. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने भक्तीसह सहा खेळाडूंची यंदा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. तसेच जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग असल्याचा अभिमान असल्याचेही भक्ती म्हणाली.