ठाणे : पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाला सुमारे ९० हजाराला गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसाच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया पोलिसाने तो पोलीस असल्याचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी पोलिसांचा पोशाख, पोलिसांचे खोटे ओळखपत्र छातीवर लावून पोलिसांची काठी आणि बेड्या देखील स्वतःजवळ बाळगल्या होत्या. ठाणे पोलीस खात्यात भरती करून देण्यासाठी त्याने नाशिक येथील अजय दिवे या तरुणाकडून सप्टेंबर २०२४ ते ३० मार्च २०२५ दरम्यान ८५ हजार रोख आणि चार हजार गुगल पे द्वारे असे ८९ हजार रुपये उकळले होते. मागील अनेक दिवस तो फक्त आश्वासन देत होता. पैसे देखील परत देत नसल्याने तोतया पोलीस समीर पेडमकर याच्या विरोधात २१ मे रोजी फसवणूक झाल्याची तक्रार पीडित तरुणाने दिली असून या गुन्ह्याचा पुढील तपास ठाणे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत.