आयोग आणि पालिका आयुक्तांच्या ऑनलाईन बैठकांचा सिलसिला
आनंद कांबळे/ठाणे
केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला असून आज राज्य निवडणूक आयुक्तांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन राज्यातील मतदान केंद्रांचा आढावा घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीची लगबग सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोग मागील १० ते १५ दिवस स्थानिक स्वराज संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेत आहे. मागील आठवड्यात युद्ध पातळीवर मतदान याद्या आद्ययवत करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मोबाईल नंबर, आधार कार्ड लिंक करण्याबरोबर नवीन मतदार नोंदणी, दुबार मतदारांची नावे वगळणे आदी कामे करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत, त्यामुळे मागील रविवारी एकाही अधिकारी-कर्मचाऱ्याला सुट्टी देण्यात आली नव्हती.
आज दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत मतदान केंद्रांची संख्या किती, मतदान केंद्रे सुस्थितीत आहेत का, याची चाचपणी करून आवश्यक तेथे युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
आगामी काळात केव्हाही निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने निवडणूक विभागाने तयारीत राहावे यासाठी ही लगबग सुरु असल्याची माहिती राज्य निवडणूक विभागातील एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.
मागील काही दिवसांपासून देशात निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे, त्यामुळे लोकसभेची निवडणूक डिसेंबर किंवा जानेवारीत लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.