मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर होणार पुनवर्सन
उल्हासनगर: मुंबई-ठाण्याच्या धर्तीवर उल्हासनगरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्या जागी टोलेजंग इमारती उभ्या राहणार आहेत. आज याबाबत महापालिका आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अधिकाऱ्यांची संयुक्त कार्यशाळा घेण्यात आली.
उल्हासनगर शहर हे अवघ्या 13 किलोमीटर क्षेत्रफळात वसलेले असून त्यात 30 ते 35 टक्के नागरिक हे 268 झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. या झोपडपट्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने आयुक्त अजीज शेख, सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे कायदे, नियम समजून घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या योजनेच्या अंतर्गत मोठमोठे टॉवर उभारण्यात येणार असून त्यात 2000 पूर्वीच्या झोपडपट्टी धारकांना 300 चौरस फुटाचे घर विनामूल्य मिळणार आहेत. 2000 नंतर 2010 पर्यंत ज्यांच्या झोपड्या आहेत त्यांना अडीच लाख रुपये भरावे लागणार आहेत. त्यासाठी झोपडीधारक आणि विकासक यांच्यात करार करणे आणि विकासकाने एसआरएमध्ये प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असल्याची माहिती पराग सोमण यांनी दिली.
याप्रसंगी उपमुख्य अभियंता नितीन पवार, उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर, सहायक निबंधक (नोंदणी) चेतन चौधरी, कार्यकारी अभियंता राजकुमार पवार, वास्तुविशारद निलेश सावंत, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार अक्षय ढाकणे, अतिरिक्त आयुक्त डॉ.करूणा जुईकर, सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे, नगररचनाकार प्रकाश मुळे, विकासक अनिल बठीजा, काई, अरुण आशान, राजा गेमनानी, सुरेश थदानी, वास्तुविशारद भूषण रूपानी, लक्ष्मण कटारिया, अमर जग्यासी, अतुल देशमुख, दुर्गाप्रसाद राय आदी उपस्थित होते.