झळाळी गेली कुठे?

नवरात्र संपले आणि दसराही साजरा झाला. आता तर दिवाळीचे वेधही लागले आहेत. आर्थिक मंदीबिंदीची चर्चा माध्यमांनी सुरु केली असली तरी त्यात काही तथ्य नसते इतका उत्साह बाजारपेठांत उसळणारी गर्दी सिद्ध करीत आहे. थोडक्यात आपली माध्यमे, पुढारी आणि तज्ज्ञमंडळी जी निरीक्षणे नोंदवत असतात, भाकिते व्यक्त करीत असतात आणि आपल्या सोयीचा अन्वयार्थ काढून राजकीय पोळी भाजून घेत असतात, त्यात फारसा दम नसतो, हेच खरे. थोडक्यात वरील तिन्ही घटकांच्या विश्वासार्हतेबद्दल त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे रहात आहे. त्यांना किती गांभीर्याने घ्यायचे याचे ठोकताळे जनतेने निश्चित केले असून ते आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून मार्गक्रमण करीत रहातात. अफवांच्या या दुनियेत कोणीच कोणाला सिरियसली घेत नाही हेच खरे.
शिवाजी पार्क येथे झालेल्या ठाकरे गटाच्या सभेबद्दल आणि आझाद मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याबाबत जनमानसात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या जनसामान्यांमध्ये बहुतांशी श्रोते हे शिवसैनिक होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया पूर्वग्रहदृष्टीने प्रभावित होत्या. म्हणजे उदाहरणार्थ श्री. उद्धव ठाकरे कितीही उत्तम बोलले असते तरी शिंदे गटातर्फे त्यांचे कौतुक झाले नसते आणि शिंदे यांचे कौतुक ठाकरे गटाने केले नसते. असे असले तरी जे शिवसैनिक अजूनही कुंपणावर आहेत त्यांनीही या दोन्ही भाषणांबद्दल फारशी उत्साहवर्धक प्रतिक्रिया नोंदवली नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.
दसरा मेळावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे समीकरण पूर्वीच झाले होते. त्यामुळे ही परंपरा चालू ठेवणे हे अनिवार्य बनले होते. तसे असल्यामुळे दोन्ही सभांतील भाषणांची तुलना दिवंगत बाळासाहेबांच्या भाषणाशी झाली. उद्धव ठाकरे हे तर थेट वंशज असल्यामुळे त्यांची तुलना अधिक होत रहाणार आणि तीच त्यांना अडचणीची ठरू शकते. त्यामानाने श्री. शिंदे यांच्यावर तुलनेने अपेक्षांचे ओझे नाही. बाळासाहेबांचे व्यक्तीमत्व, भाषणाची शैली, त्यांच्यातील व्यंगचित्रकार, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा आणि बेधडक वृत्ती यांमुळे त्यांची आगळी-वेगळी प्रतिमा निर्माण झाली होती. या गुणांचा विचार केला तर उद्धव आणि शिंदे यांच्याकडून बाळासाहेब निभावले जाणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे त्या दोघांच्या भाषणातील मुद्यांपेक्षा त्यांचे प्रकटीकरण यालाच महत्व प्राप्त होते. मुळात इथेही या दोन नेत्यांची मोठी गोची झाल्याचे दिसले. श्रोत्यांनी विचारांचे सोने घेऊन जावे असे मुद्दे पुढे आले नाहीत, कारण दोन्ही नेते सातत्याने विविध माध्यमांच्या व्यासपीठांवरून जनतेसमोर येतच असतात आणि तिथे जी मांडणी होते तीच जाहिर सभेत झाली तर त्यातून लक्षवेधी मुद्दे गवसायचे ते कसे? त्यामुळे भाषणाला वैचारिक धार मिळवून देणारे मुद्दे आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडे गेलेच नाहीत! या ट्रॅपमधून त्यांची सुटका होता होत नाही हेच या सभांच्या प्रभावहिनतेचे एकमेव कारण आहे.
बाळासाहेबांची भाषणे प्रभावी होण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी स्वतः सत्तेच्या खूर्चीचा मोह टाळला होता. त्यामुळे विरोधकांवर आसुड ओढताना त्यांनी स्वत:च्या मुख्यमंत्र्यावरही चाबुक चालवला होता. लोकांना त्यांची ही शैली आवडे आणि बाळासाहेब जणू आपल्याच मनातले बोलत आहेत असे त्यांना वाटून जाई. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना हा ’अ‍ॅडव्हान्टेज’ नाही. कारण दोघेही सत्तेच्या खूर्चीवर बसलेले ! त्यामुळे सत्तारुढ पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. ऐकणारे बोलणार-अहो, सत्ता दिली ती वापरा. टीका कसली करता?
या मोठ्या अडचणीवर मात कशी करायची याबाबत दसरा मेळाव्यापूर्वी भाषणाची जी काही तथाकथित पूर्वतयारी झाली असेल त्यात विचार झाला होता काय हे कळायला मार्ग नाही. टीका, आरोप-प्रत्यारोप, कुरघोड्या यापलिकडे जाऊन उद्याचा महाराष्ट्र, त्याबाबतच्या नाविन्यूपर्ण कल्पना, योजना, लोककल्याणाचे प्रारुप, भविष्याचा वेध , सध्या उभे ठाकलेले प्रश्न आदी बाबींचा समावेश भाषणांत असता तर ते प्रभावी ठरले असते. अलिकडे राजकारणाला भूतकाळाची तरी बाधा झालेली दिसते किंवा वर्तमानाच्या व्हायरसने त्यांच्या मेंदूचा ताबा घेतला आहे असे वाटते. त्यामुळे ’लाँग-टर्म’ बाबींचा विचार भाषणांतून उमटत नाही.
वास्तविक पहाता आगामी निवडणुकीपूर्वीचा हा दसरा मेळावा होता. त्याचा फार कल्पकतेने वापर होणे अपेक्षित होते. पक्षाच्या भविष्यातील ध्येयधोरणांची रुपरेषा मांडण्याची संधी होती. अवघ्या महाराष्ट्रातील 15-16 कोटी जनतेच्या आशा-आकांक्षांना शब्दबद्ध करण्याची मुंबई-ठाण्यातील या दोन नेत्यांना ‘पॅन-महाराष्ट्र’ प्रतिमा निर्माण करण्याची ही संधी होती. स्वर्गीय बाळासाहेबांना ही आव्हाने नव्हती. परंतु केवळ या सबबीखाली उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याला संधीचे सोने करु नये, हे पटत नाही. आम्हाला या दोघांकडून अधिक टोकदार, विधायक आणि परिणामकारक भाषणांची अपेक्षा होती. विचारांच्या सोन्याची झळाळी कुठे गेली, हा अस्वस्थ प्रश्न महाराष्ट्राला पडला असेल तर नवल नाही. नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर वातावरण निवडणुकीच्या मोडमध्ये आणताना ठाकरे यांना सहानुभूतीचा पाया भक्कम करण्याची तर शिंदे यांना खोक्यांच्या आरोपांतून मुक्त होण्याची संधी या दसऱ्याने दिली होती. ती वाया तर गेली नाही ना, या प्रश्नाच्या उत्तरासाठी निवडणुकीपर्यंत थांबावे लागेल.