औषधांवर सूट देणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करणार

सरकारी बडगा : रुग्णांना फटका
ठाणे: गरीब रुग्णांना औषधावर दोन ते १८ टक्के सूट देणाऱ्या औषध विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने काढले आहेत. या कारवाईमुळे सर्वसामान्य रुग्णांना मात्र मोठा फटका बसणार आहे.
ठाण्यातील काही औषध विक्रेते औषधाच्या मूळ किंमतीवर दोन ते १८ टक्के सूट देत होते त्यामुळे औषधाच्या किंमतीवर अनेक पट नफा मिळविणाऱ्या औषध विक्रेत्यांच्या विक्रीवर परिणाम होऊन त्यांचा नफा कमी झाला होता. दुसरीकडे दोन ते १८ टक्के सूट काही विक्रेते सामाजिक भावनेतून देत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळत होता. याबाबत अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्याकडे काही विक्रेत्यांकडून तक्रार करण्यात आली होती. डॉक्टर आणि रुग्णालयांना जो नियम लावला जातो तो नियम सूट देणाऱ्या औषध विक्रेत्यांच्या विरोधात लावून त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त भूषण पाटील यांनी काढले आहेत.
या आदेशामुळे अनेक गरीब रुग्णांना यापुढे औषधावरील सूट मिळणार नाही. राज्यात उपचारापेक्षा जास्त खर्च औषधावर होत असतो. औषधावर काही टक्के सूट मिळत असल्याने गरिब रुग्णांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. परंतु अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परिपत्रकामुळे त्यांना महागडी औषधे विकत घेणे भाग पडणार आहे.
याबाबत सूट देणाऱ्या एका औषध विक्रेत्याने सांगितले कि कपडे, साहित्य, पुस्तके, हॉटेलमधील खाद्य पदार्थावर सूट मिळते, परंतु गरजवंत गरिबांना औषधं आणि वैद्यकीय साहित्यावर सूट दिली, त्याची प्रसिद्धी केली तर रुग्णांना प्रलोभन दाखवल्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाणार आहे. अधिकाऱ्यांना य विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणे कितीपत योग्य आहे, असा प्रश्न या विक्रेत्याने उपस्थित केला आहे.
तर सूट न देता औषध विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाची भूमिका योग्य असल्याचे म्हटले आहे. रुग्णांना सूट देण्याचे आमिष दाखवून काही जण त्यांच्याकडील औषधांची विक्री करतात, ते नियमात बसत नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे औषधांच्या किमतीवर नियंत्रण असते. सूट देऊन दर्जेदार औषधांची विक्री होते की नाही हे समजत नाही. प्रलोभनातून गरीब रुग्ण औषधे खरेदी करतात,असा दावा त्या विक्रेत्याने केला आहे.