झाडाची फांदी पाडून दुचाकीवरील दोघे जखमी

ठाणे: रस्त्याकडील झाडाची फांदी पडून दुचाकीवरील दोघे जखमी झाले. ही घटना कासारवडवली येथे बिकानेर स्वीटस शॉपजवळ घडली.

तरंग चतुर्वेदी (३५) राहणार कांदिवली आणि पवन शर्मा (२२) राहणार भाईंदर अशी जखमींची नावे आहेत. तरंग चतुर्वेदी याच्या डोके आणि पोटाला दुखापत झाली आहे तर पवन शर्मा यांच्या तोंड आणि मानेला दुखापत झाली आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान १- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेली झाडाची फांदी कापून बाजूला केली. दुर्घटनेत दुखापत झालेल्या व्यक्तींना वेदांत रुग्णालय, घोडबंदर रोड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

ठाण्यात पावसाळ्यात झाडे आणि फांद्या पडून पादचारी आणि वाहन चालकांना इजा होण्याच्या घटना घडत असतात. कधी-कधी यात जीवितहानीही होत आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच अशा घटना घडू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. रस्त्याकडील कललेली धोकादायक झाडे अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाने वेळीच छाटून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी ठाणेकर करत आहेत.