शरद पवार गटाकडून भिवंडीत ट्रम्प कार्ड; बाळ्यामामा म्हात्रे रिंगणात

* कपिल पाटील यांना कडवी झुंज
* काँग्रेसमध्ये मात्र असंतोष

मुंबई : आगामी लोकभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये दोन उमेदवारांचा समावेश आहे. त्यानुसार बीडमधून बजरंग सोनावणे तर भिवंडीतून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात गेल्याने भिवंडी काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवार गटापैकी कोणाच्या वाट्याला येणार, यावरुन वाद सुरु होता. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भिवंडीतून काँग्रेसच्या उमेदवाराला लक्षणीय मतं पडली होती. त्यामुळे काँग्रेस पक्ष भिवंडी मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नव्हता. मात्र, या निवडणुकीत शरद पवार गटाकडे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांच्यासारखा तगडा उमेदवार असल्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी, असा शरद पवार गटाचा आग्रह होता. भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर देण्यासाठी बाळ्यामामा योग्य उमेदवार असल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळेच शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्यातील लढाईत कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल.

या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्ष भिवंडीच्या जागेसाठी ठाम होता. त्या दृष्टीने मतदारसंघात काँग्रेसची प्रचार यंत्रणा कामाला लागली होती. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे हे देखील मतदारसंघात सभा-बैठका घेऊन सकारात्मक वातावरण तयार करत होते. राष्ट्रवादीने या मतदारसंघावरील दावा सोडावा, असे आवाहन ते वारंवार करत होते. मात्र तरीही ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे गेल्याने या जागेचा तिढा आणखीन क्लिष्ट झाला असल्याचे बोलले जात आहे.

कपिल पाटील यांना काँटे की टक्कर देणारा उमेदवार

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केल्याने भिवंडी लोकसभेची यंदाची लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपचे कपिल पाटील 2014 आणि 2019 अशा दोन वेळेस भिवंडीतून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी असली तरी भिवंडीत कपिल पाटील यांच्यासमोर उभा राहू शकेल, असा उमेदवार रिंगणात दिसत नव्हता. मात्र, आता कपिल पाटील यांच्याशी सर्व बाबतीत बरोबरी करु शकणाऱ्या बाळ्यामामा यांना रिंगणात उतरवून शरद पवार यांनी भिवंडीत मोठा डाव खेळल्याचे बोलले जात आहे.

सुरेश म्हात्रे हे भिवंडीतील स्थानिक नेते असून त्यांना कपिल पाटील यांच्याप्रमाणेच आगरी समाजाचा पाठिंबा आहे. आगरी समाजातील तरुणांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. याशिवाय, जात किंवा धर्म न बघता आपल्यासोबत काम करणाऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे बाळ्यामामा यांनी भिवंडीत आगरी समाजासोबत अन्य समूहाच्या लोकांनाही आपल्यासोबत जोडले आहे. त्यामुळे भिवंडी लोकसभेच्या लढाईत बाळ्यामामा म्हात्रे हे कपिल पाटलांसाठी तुल्यबळ उमेदवार मानले जात आहेत. यंदा त्यांच्यापाठिशी महाविकास आघाडीची ताकद उभी राहिल्याने सुरेश म्हात्रे भिवंडीतील कपिल पाटलांची सत्ता उलथवून लावणार का, हे आता पाहावे लागेल.