धावत्या दुरांतो एक्सप्रेसमध्ये महिलेने दिला कन्येला जन्म

कल्याणचे तिकीट तपासनीस धावले मदतीला

ठाणे : मुंबई एलटीटी ते प्रयागराज दुरांतो एक्सप्रेसमध्ये जाणा-या गाडीमध्ये गरोदर महिलेची प्रसूती होऊन तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

या एक्स्प्रेस गाडीमध्ये कल्याण शहरातील असलेले मध्य रेल्वेतील मुख्य सीटीआय म्हणून ड्युटीवर असलेल्या नंदबिहारी मीना आणि त्यांच्या सहका-यांचेही माणुसकीचे दर्शन दर्शवले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनीही संबंधित सर्वांची ‘वाहवा’ केली आहे.

‘महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या आणि एलटीटी प्रयागराज दुरांतो एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली. त्याचवेळी एक्सप्रेसमध्ये असलेले तिकीट तपासनीस महिलेच्या मदतीला धावून आले आणि सह-महिला प्रवाशांच्या मदतीने महिलेची सुखरूप प्रसुती झाली आणि धावत्या एक्सप्रेसमध्ये या महिलेने गोंडस बेबी बाळाला जन्म दिला,असे एनबी मीना म्हणाले.

एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासनीसांनी सह-महिला प्रवाशांची मदत घेत एका महिला प्रवाशाची सुखरूप प्रसूती केली. कल्याण येथे राहणारे नंदबिहारी मीना, अलोक शर्मा, राजकरण यादव आणि इंद्रकुमार मीना या तिकीट तपासनीस कर्मचा-यांसह इतर सर्वांना ट्रेनमधील महिलेच्या बाळंतपणाची माहिती मिळताच तत्काळ संबंधित हालचाली करुन दुस-या महिला प्रवाशांचीही मदत घेतली आणि गर्भवती महिलेची सुरक्षितपणे प्रसूती करण्यात मदत केली आहे. त्यांच्या या धाडसी कृतीचे मध्य रेल्वेच्या सर्व स्तरातून कौतूक करण्यात आले आहे. तिकीट तपासनीस कर्मचारी यांनी तत्काळ रेल्वेतील संबंधित यंत्रणेला घटना कळवून बुरहानपुर येथे आपत्कालीन थांबा देण्याची व्यवस्था केली.

त्यानंतर आई आणि नवजात शिशुला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेण्यात आले आहे. येथील सिटी रुग्णालयात आई आणि नवजात बाळ दोघेही निरोगी आहेत,असे श्री. मीना यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.