आग विझवताना अग्निशमन दलाचे तीन जवान गुदमरले

ठाणे : कापूरबावडी नाका येथील हायस्ट्रीट मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सिनेमा गृहाच्या स्नॅक्स सेंटरला काल रात्री भीषण आग लागली. ही आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांपैकी तीन जण गुदमरले  तर एक जण काचा लागून जखमी झाला. त्यांच्यावर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौघांचीही प्रकृती स्थिर आहे.

काल रात्री ११.३०च्या दरम्यान हायस्ट्रीट मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सिने पोलीस मुव्ही थिएटर या सिनेमागृहातील स्नॅक्स कॉर्नरला आग लागली होती. त्याबाबत या सिनेमागृहाचे व्यवस्थापक सुजित सरवदे यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती दिली. त्याची माहिती मिळताच बाळकुम अग्निशमन दलाच्या दोन रेस्क्यू गाड्या, एक जम्बो पाण्याचा टँकर आणि दोन आग बंबाच्या सहाय्याने सुमारे पाच तासानंतर ही आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग विझवत असताना दीपक बोराडे, सुनिल दराडे, विशाल पाटील हे जवान गुदमरले तर जे. पी. वाघ यांना काचा लागून ते जखमी झाले आहेत. या चौघांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळवले आहे.

आग लागल्याची घटना घडली त्यावेळी अग्निशमन विभागाचे उपायुक्त, कापूरबावडी पोलीस ठाण्यातील अधिकार कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी जवान यावेळी उपस्थित होते.