ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत.

या कामांमुळे बुधवार २१ मे, २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.