घराला लागलेल्या आगीत साडेतीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू

कसारा : आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कसारा बायपासजवळ एका घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आले नाही

मंगळवारी सकाळी ८च्या सुमारास शहापूर तालुक्यातील कसारा बायपासजवळ वाशाळा मार्गावर दत्ता बुळे नामक नागरिकाच्या घराला अचानक आग लागली. त्याच वेळी रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या मुलांच्या हे लक्षात येताच ही मुले आग विझवण्यासाठी थांबले. त्यांनी घराजवळ साठवून ठेवलेल्या पाण्याच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यावेळी एक लहान मुलगा आगीच्या विळख्यात अडकल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लहान मुलाला बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. मात्र खर्डी रूग्णालयात घेऊन जात असतानाच रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. कृष्णा बुळे असे मृत मुलाचे नाव असून तो साडेतीन वर्षांचा होता.