शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन

ठाणे : आदिवासी समाज हा शिक्षणाने प्रगती करू शकतो. त्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी निधी कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

मीरा भाईंदर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहांचे लोकार्पण मंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी  आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडीत, खासदार राजेंद्र गावित, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मिरा भाईंदर आयुक्त दिलीप ढोले, आदिवासी विभागाचे सहसचिव श्री. वसावे, प्रकल्प अधिकारी रंजना किल्लेदार आदी उपस्थित होते.

मंत्री डॉ. गावित म्हणाले की, आश्रमशाळेतील चांगली खेळणारी मुले एकत्र करून त्यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करुन घेण्यात येणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. त्यासाठी विद्यार्थ्यांना कुठे जाण्याची गरज लागणार नाही.
विविध योजनांसाठी लागणारी आवश्यक  असणारी कागदपत्रे आदिवासी बांधवाकडे नाहीत. त्यामुळे त्यांना योजनाचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी आदिवासी बांधवाना आधारकार्ड व बॅंक पासबुक तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावे. जिथे जिथे जागा उपलब्ध होईल तिथे आश्रमशाळा उभारण्यात येईल. इमारत दोन वर्षामध्ये पूर्ण करण्यात येईल. आदिवासी योजनासाठी निधीची कमतरता पडणार नाही, असेही श्री. गावित म्हणाले.

श्री.पंडीत म्हणाले की,  आपल्या आश्रमशाळा खुप जुन्या झाल्या आहेत. त्या नवीन बनवण्याची आवश्यकता आहे. आढावा समिती मार्फत शिफारशी केल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी इमारती उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन पाहणे सोपे होईल. आदिवासीचे वन जमिनीचे दावे प्रलंबित आहेत.त्यावर मार्ग काढला तर त्यांना न्याय मिळेल.

श्री. सरनाईक म्हणाले की,  ठाण्यामध्ये आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे भूमीपूजन या महिन्यात मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्त होणार आहे. या वसतीगृहामध्ये 700 मुली एकावेळी राहू शकतील. त्यामुळे आदिवासी मुलींच्या राहण्याचा प्रश्न लवकरच मिटेल. आदिवासी विकासासाठी त्यांना मूलभूत सुविधा लवकरात लवकर पुरविण्यात येणार आहेत. आदिवासी पाड्यातील पाण्याचा प्रश्न ही सोडविणार आहे.
यावेळी  उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी  श्री. शिनगारे म्हणाले की, आदिवासीच्या जमिनीना दिलेल्या अधिकारांचा वापर करुन त्यांना संरक्षण देण्यात येईल. आदिवासीच्या योजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात येईल.
यावेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले यांनी मनोगत  व्यक्त केले.