पोलिसांनी केले रक्तदान;
गरोदर महिलेचे वाचले प्राण
ठाणे: वाहतूक विभागाच्या पोलिसांबाबत सर्वसामान्य नागरिकांकडून सहसा चांगले बोलले जात नाही, परंतु ठाणे पोलिसांनी एका गरोदर महिलेसाठी रक्तदान करून बाळ आणि त्या महिलेचे प्राण वाचवल्याची घटना पोलिसांबद्दलचा आदर वाढविणारी ठरली आहे.
तीन हात नाका येथे वाहतूक विभागाचे पोलिस वाहतुकीचे नियमन करत असताना कशेळी येथे राहणारे सुनिल शिंदे नावाचे गृहस्थ आले होते. त्यांची पत्नी गरोदर आहे. ती कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात बाळंतपणाकरिता दाखल असून तिला ओ पॉझिटीव्ह रक्ताची गरज आहे. परंतु रक्त मिळत नाही, काहीतरी मदत करा अशी विनंती त्यांनी केली. पोलिसांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांना ही हकीकत सांगितली असता त्यांनी सर्व पोलीस शिपाई, अंमलदार यांना बोलावून घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस शिपाई अतुल डहाळे आणि सुरज जाधव हे दोघे जण रक्तदान करण्यास तयार झाले. या दोघांनी नौपाडा येथील एका ब्लड बँकमध्ये रक्तदान केले. त्या बँकेने श्री. शिंदे यांना ओ पॉझिटीव्ह रक्त दिले. हे रक्त तातडीने कळवा येथील रुग्णालयात पाठविण्यात येऊन महिलेला ते देण्यात आले. वेळीच रक्त मिळाल्याने त्या महिलेचा आणि मुलाचा जीव वाचला. सौ. शिंदे यांना मुलगा झाला.
पोलिसांनी वेळेवर रक्ताची सोय केल्यामुळेच माझी पत्नी आणि मूल वाचल्याची भावना श्री.शिंदे यांनी व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहे. याबाबत वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मानवतेच्या दृष्टीकोनातून आम्ही त्याला मदत केली. रक्तदान केल्याने त्या गरजुला मदत झाली, हे आमच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तर रक्तदाता अतुल डहाळे म्हणाले, आम्ही क्षणाचाही विलंब न करता रक्तदान केले, त्याचे समाधान वाटते.