ठाण्यातून राजन विचारेंना तिसऱ्यांदा उमेदवारी
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अखेर शिवसेना ठाकरे गटाने विद्यमान खासदार राजन विचारे यांना दिली असली तरी कल्याणच्या उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम आहे.
शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यातील १७ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे विद्यमान खा.श्री.विचारे यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास टाकून तिसऱ्यांदा त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांची लढत शिवसेना कि भाजपा उमेदवाराबरोबर होणार हे अजूनही स्पष्ट झाले नाही. या १७जणांच्या यादीत कल्याण आणि पालघर या दोन मतदार संघाच्या उमेदवारांची नावे नाहीत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री पुत्र विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर लढत देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. या मतदारसंघात उमेदवार आयात करणार कि स्थानिक उमेदवार देणार याकडे कल्याण, डोंबिवली, कळवा मुंब्रा, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथिल मतदारांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चेत जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवावेत असे ठरले असल्याने ठाकरे गट वररुण सरदेसाई, केदार दिघे, सुषमा अंधारे कि आणखी वेगळाच उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर खा. श्री. विचारे म्हणाले कि पहिली सत्ता ज्या ठाण्याने शिवसेनेला दिली त्या ठाण्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या विकास कामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे. ठाण्यात गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा सामना होणार आहे. यात ठाणेकर जनता मला निश्चितच न्याय देईल, अशी प्रतिक्रिया श्री.विचारे यांनी दिली.