ठाणे: राज्यातील सर्वाधिक मोठे आधारकार्ड केंद्र हे ठाण्यात उभारण्यात आले आहे. या आधारकार्ड केंद्रात अवघ्या १० मिनिटात आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ठाण्याच्या लेकसिटी मॉलमध्ये हे केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्रात दररोज ३०० पेक्षा अधिक नागरिक या केंद्राचा लाभ घेत आहेत.
केंद्र शासनाने आधारकार्ड या योजनेला विशेष महत्व दिले आहे. त्यानुसार भारतात ७६ तर, महराष्ट्रात नागपूर, अमरावती, पुणे धुळे आणि ठाणे आदी आठ ठिकाणी हे केंद्र उभारण्यात आले आहेत. यामध्ये ठाण्यातील लेक सिटी मॉलमध्ये उभारण्यात आलले केंद्र हे राज्यातील सर्वात मोठे केंद्र आहे. याठिकाणी आधारकार्ड काढण्याची पद्धत सोपी व सूटसुटीत असून यासाठी इतर आधारकेंद्राप्रमाणे वेळ खर्ची करावा लागत नसून अवघ्या १० मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन आधारकार्ड काढण्यासाठी अथवा आधारकार्ड मधील काही दुरुस्त्या करण्यासाठी आलेली व्यति केंद्राच्या बाहेर पडत आहे. या ठिकाणी १६ काऊंटरच्या माध्यमतून ही प्रक्रिया पार पाडण्यात येते. त्यात सध्याच्या घडीला या केंद्राच्या माध्यामतून २०० ते २५० आधारकार्ड काढण्याच्या व दुरुस्तीच्या प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तर, या ठिकाणी प्रतिदिन एक हजार आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया राबविण्याची क्षमता असल्याची माहिती केंद्र प्रमुखांनी दिली आहे.
कापुरबावडी येथे उभारण्यात आलेल्या या आधारकार्ड केंद्राला आमदार संजय केळकर यांनी भेट देऊन तेथील प्रक्रिया समजावून घेतली. केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड काढावे लागते, ठाणेकर नागरिकांसह जिल्हावासीयांसाठी राज्यातील सर्वात मोठे केंद्र ठाण्यात उभारण्यात आले आहे. या आधार केंद्रामध्ये एक हजार नागरिकांच्या आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया १० मिनिटात पूर्ण करता येत आहे. त्यामुळे आधार केंद्र आपल्या दारी अशी भूमिका केंद्र सरकारची आहे. दर पाच वर्षांनी आपले आधारकार्ड नुतनीकरण करावे लागणार असल्याचे सांगत, जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आमदार संजय केळकर यांनी केले.