आयुक्तांनी राजशिष्टाचार पाळावा; विरोधी पक्षनेते फडणवीस यांचा आयुक्त ढोले यांना टोला

भाईंदर : महानगरपालिका क्षेत्राचा विकास हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्तिक गाड्याशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करताना महापौरांनी निर्देशित केलेल्या राजशिष्टाचाराचे पालन करणे नैतिक जबाबदारी ही आयुक्तांचीच असते अश्या शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांना टोला लगावला आहे.

रामदेव पार्क येथे धम्म अशोक सम्राट बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा तसेच अन्य विविध उपक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते. सदरहु लोकार्पण सोहळा हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते करण्यात यावे अशी मागणी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली होती. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले आणि कपिल पाटील यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र अव्हाड तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना देखील महापौरांनी आमंत्रित केले होते.

या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत मात्र लोकार्पण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस जितेंद्र अव्हाड, एकनाथ शिंदे आणि प्रवीण दरेकर या चार मान्यवरांची नावे प्रकाशित करण्यात आली होती. त्यामुळे भाजपाने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार असल्याची निमंत्रण पत्रिका प्रकाशित केली होती. या वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिकेमुळे महापालिका प्रशासन आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली होती.
या लोकार्पण सोहळ्याला एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे मंत्री गैरहजर होते मात्र या सोहळ्यत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय भाष्य करण्यास टाळले. तर महाजन वाडी येथे उभारण्यात आलेल्या तरण तलावाचे श्रेय माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देतानाच त्यांचे कौतुक केले.

यावेळी भाषण करताना मात्र देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक करताना प्रकाशित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवरुन आयुक्त दिलीप ढोले यांचा शेलक्या शब्दात अखेर समाचार घेतला. लोकार्पण सोहळा एकनाथ शिंदे, जितेंद्र अव्हाड, किंवा प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला असता तरी त्यावर आपण नाराजी व्यक्त केली नसती परंतु उद्‌घाटक म्हणून चार चार मान्यवरांची नावे प्रकाशित करने हे राजशिष्टाचाराला धरुन नाही महानगरपालिका क्षेत्राचा विकास हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्तिक गाड्या शिवाय होऊच शकत नाही त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करताना महापौरांनी निर्देशित केलेल्या राजशिष्टाचाराचे पालन करण्याची नैतिक जबाबदारी आयुक्तांवरच असते अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना टोला लगावला आहे.