शिंदे गटाला लढावे लागणार आतले आणि बाहेरच्यांशीही

शिंदे गटाला घेऊन आयुक्तांनी दौरे केल्यास राष्ट्रवादी करणार विरोध

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ठाकरे गटाशी एकीकडे संघर्ष करावा लागत असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीनेही ठाण्यात शिंदे गटाला अंगावर घेण्याची तयारी केली आहे. ठामपा आयुक्तांनी यापुढे या गटाच्या माजी नगरसेवकांना बरोबर घेऊन शहरात पाहणी दौरे केले तर त्याला विरोध केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. यामुळे ठाण्यात शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा सामनाही होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेची सद्या मुदत संपल्याने प्रशासकीय राजवट असून पालिका आयुक्तांनी एकट्याने पाहणी दौरे करणे अपेक्षित आहे, मात्र आयुक्तांच्या दौऱ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक सर्रास दिसतात. यापुढे माजी नगरसेवक प्रशासनाबरोबर फिरले तर याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असेल असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.

सध्या पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संपूर्ण शहरात पाहणी दौरे सुरु केले असून यामध्ये विकास कामांचा आढावा देखील घेतला जात आहे. ज्या ज्या ठिकाणी आयुक्त फिरत आहेत, त्या त्या ठिकाणी माजी महापौर नरेश म्हस्के तसेच काही माजी नगरसेवक देखील या दौऱ्यात सामील होत आहेत. यास राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. प्रशासक म्हणून पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी एकट्याने दौरे करणे अपेक्षित असताना त्यांच्या सोबत जर शिंदे गटाचे माजी नगरसेवक फिरत असतील तर त्याला आमचा विरोध असल्याचे आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

राष्ट्रावादीचे काही नगरसेवक फुटणार असल्याचे वक्तव्य माजी महापौर नरेश म्हस्के यांनी केले होते. मात्र या वक्तव्याला शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जे गद्दारी करतात त्यांच्याकडून अशाप्रकारची भावना व्यक्त होणार असल्याची टीका परांजपे यांनी केली आहे. आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकजूट असून राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक फुटणार नसल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले.