पहिल्याच दिवशी शाळेची घंटा वाजलीच नाही

शाळेच्या साहित्यावर चोरांनी मारला डल्ला

अंबरनाथ : दोन वर्षांच्या कालावधीनंतर आज सर्वत्र उत्साहात शाळा सुरु झाल्या. विविध शाळांत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले, मात्र हिंदी माध्यमाच्या एका शाळेतील घंटा आणि पंखे चोरांनी लंपास केल्याने शाळेची घंटा न वाजवता वर्ग भरवण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली.

येथील जुना भेंडीपाडा येथे गेल्या ६३ वर्षांपासून सुरु असलेल्या राष्ट्रीय हिंदी विद्यालयात सुट्टीच्या कालावधीत चोरटयांनी शाळेत शिरून  नऊ पंख्ये, पाण्याचे जुने मीटर, चहाची किटली, पितळी घंटा, ट्यूबलाईट तसेच प्रयोग साहित्याची पेटी असा सुमारे साडे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार १४ जून रोजी शाळा उघडल्यानंतर उघडकीला आला.  शाळेत पहिली ते सातवीच्या १३० विद्यार्थी असून सहा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. शाळेतील पंख्ये चोरून नेल्याने एन उन्हाळाच्या दिवसात उकाड्यातच शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस घालावा लागला.

शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने ३ मे २०२२  ते ६ जून २०२२ या कालावधीत शाळेत चोरी  झाल्याचे  शाळेच्या वतीने सांगण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  मंगळवार  १४ जून २०२२ रोजी  या प्रकरणी  शाळेच्या वतीने राजेश पांडे यांनी  दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलिसांनी दिली. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस. एस. भालेराव याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.