स्मशानभूमींमधील धुराचा त्रास आधुनिक यंत्रणेमुळे थांबणार

स्मशानभूमींचे सुशोभीकरण व गॅस दाहिन्या बसविण्यासाठी पाच कोटी

ठाणे : नागरी वस्त्यांमधील स्मशानभूमी स्थलांतरित कराव्यात, त्यातील धुराचा त्रास थांबावा, स्मशानभूमींचे अद्ययावत पद्धतीने सुशोभीकरण करून त्यात गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बसविल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी राज्य सरकारकडे केलेली ५० कोटी निधीची मागणी मान्य झाली असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहरातील रामबाग, येऊर गाव, बाळकुम, मोघरपाडा, वाघबीळ गाव, माजिवडा गाव या पाच ठिकाणच्या स्मशानभूमींचे टप्प्या टप्प्याने आधुनिकीकरण व सुशोभीकरण केले जाणार आहे. आमदार सरनाईक म्हणाले की, जुन्या स्मशानभूमींचे नूतनीकरण-सुशोभीकरणाचा आराखडा तयार केला आहे. स्मशानभूमीला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार, आतमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, अंत्यविधी हॉल, श्री शंकराचे मंदिर, स्मशानभूमी परिसरात गार्डन व लॅन्ड स्केपिंग, आतमध्ये प्रकाश व्यवस्था व पाण्याची सुविधा, डिलक्स स्वच्छतागृह, प्रार्थना हॉल, पार्किंगची सुविधा, स्मशान भूमीमध्ये पेव्हर ब्लॉक, नातेवाईकांच्या आंघोळीची सोय, सोलार दिवे व सोलार बंब अशा सर्व सुविधा सुशोभीकरणात केल्या जातील. तसेच ज्याठिकाणी सीएनजी गॅस पुरवठा आहे तिथे सीएनजीवर दाहिनी चालवली जाईल. तर जिथे सीएनजी नाही तिथे एलपीजी गॅसवर दाहिन्या चालवल्या जाणार आहेत. गॅसवर चालणाऱ्या दाहिन्यांमुळे खर्चही अर्ध्याने कमी होईल तसेच प्रदूषणही होणार नाही. या सर्व स्मशानभूमीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे दोन यंत्रे लागणार असून संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे.

ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून अनेक स्मशानभूमीच्या परिसरात नागरीकरण झाले आहे. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने लाकूड जाळून अंत्यसंस्कार केले जातात त्यामुळे तेथील राखेचा-धुराच्या वासाचा त्रास नागरिकांना होतो. स्मशानभूमीमधून राखेचे धूलिकण उडतात, अनेकांच्या घराच्या खिडकीवर-एसीवर बसतात. त्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरात प्रदूषण होत असल्याच्या तेथील नागरिक तक्रार करीत आहेत. तसेच इलेक्ट्रिक म्हणजेच विद्युत दाहिनी बसविल्यास त्यावर वीज बिलाचा खर्च अधिक होतो. त्यामुळे ही सर्व परिस्थिती बदलण्यासाठी आता स्मशानभूमींचे नूतनीकरण करताना सीएनजी / एलपीजी गॅस दाहिनी मशीन बसविली जाणार आहे. त्याचवेळी तेथे ‘स्मोक न्यूसन्स अबेटमेन्ट सिस्टीम’ म्हणजेच ‘धुराचा उपद्रव कमी करणारी यंत्रणा’ बसवली जाणार आहे.

स्मोक न्यूसन्स अबेटमेंट यंत्रणेमुळे अग्निसंस्कार झाल्यानंतर प्रदूषण होत नाही. धूर व राखेचे कण बॉयलरमध्ये जातात. त्याचे शुद्धीकरण त्या यंत्रामध्ये होते व शुद्ध झालेली हवा ३० मीटर उंच चिमणीमधून शुद्ध करून बाहेर फेकली जाते. या आधुनिक यंत्रणेमुळे ८० टक्के वायू प्रदूषण कमी होईल.

टप्प्या-टप्प्याने मतदारसंघातील सर्व स्मशानभूमींमध्ये या यंत्रणा बसवल्या जातील व सर्व स्मशानभूमींचे आधुनिकीकरण केले जाईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.