ठाणे : जाहिरात फलकांच्या माध्यमातून लाखो रुपये कमावणाऱ्या आणि तरीही महापालिकेची देणी थकवणाऱ्या जाहिरात कंपन्यांचे १९ मोठे होर्डींग उतरवण्यात आले आहेत.
ठाणे पालिकेच्या तिजोरीला हातभार लागावा आणि बेकायदा फलकबाजीला लगाम बसावा यासाठी ठाणे महपालिकेने जाहिरात धोरण जाहिर केले होते. त्यानुसार शहरात ५२८ होर्डींगना परवानगी देण्यात आली आहे. त्यातून वार्षिक किमान १५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात त्याचे निम्मेच शुल्क पालिकेच्या जाहिरात विभागात जमा होत आहे. अशा थकबाकीदारांची यादी २०० च्या घरात आहे.
कोव्हिडमुळे ठाणे पालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने प्रशासनाने वसुलीकडे लक्ष दिले आहे. त्याअंतर्गतच जाहिरात विभागानेही आता थकबाकीदारांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याची सुरुवात कोव्हिड काळाच्या आधीपासूनच्या थकबाकीदारांपासून करण्यात आली आहे. सोमवारी 26 डिसेंबर पासून या कारवाईला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 19 फलक उतरवण्यात आले आहेत. त्यानंतर थकबाकीदारांनी 42 लाख रुपयेही जमा केले आहेत पण तरीही ही कारवाई यापुढे अशीच सुरू राहणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.