ठाणे : ठाणे येथील शासकीय तंत्रनिकेतन ठाणे या नामांकित व शासकीय अनुदानित, संस्थेत यंत्र, स्थापत्य, केमिकल अभियांत्रिकी, कॉम्प्यूटर इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ट्रॅव्हल टुरिझम या विविध विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मुंबई, ठाणे, पुणे, अंबरनाथ, महापे, महाड, पातळगंगा, भिवंडी येथील औद्योगिक कंपन्यांमध्ये उच्च पगाराचे प्लेसमेंट मिळाले आहेत.
या संस्थेत गोदरेज, रिलायन्स, टेक्निप एनर्जी, आदित्य बिर्ला, एसबी इंटरनॅशनल, श्री ललिता, टाटा मोटर्स, कल्पतरू, शहापूर पालमजी, जी ई एरोस्पेस पुणे, सीएट अंबरनाथ, संत गोबीन, वरली इंडिया, आनंद ग्रुप पुणे, दिल्ली मेट्रो इत्यादी कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
कॅम्पस प्लेसमेंटद्वारे विद्यार्थ्यांना साधारण अडीच ते साडेचार लाख प्रति वर्ष पॅकेज मिळाले आहे. संस्थेतील यंत्र विभागातील वेदांत पाटील या विद्यार्थ्यास टाटा मोटर्स या कंपनीमार्फत नोकरी तसेच शिक्षणाची संधी कमवा व शिका या आगळ्या वेगळ्या कमवा आणि शिका या योजनेंतर्गत मिळाली आहे. या विद्यार्थ्यास बिट्स पिलानी या नामांकित संस्थेद्वारे बी टेक पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठी प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी व या विभागामार्फत विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे मार्गदर्शन दिले जाते. जसे की रिझुम रायटिंग, मुलाखतीसाठी तयारी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, रोजगाराच्या संधी यासाठी विविध विभागातर्फे व प्लेसमेंट विभागातर्फे विशेष प्रयत्न केले जातात. तसेच दिल्ली मेट्रो अंतर्गत मुंबई मेट्रोसाठी संस्थेतील साधारण सोळा विद्यार्थ्यांना मुंबई मेट्रोसाठी निवड करण्यात आली आहे.
प्लेसमेंट यशस्वीरित्या होण्यासाठी प्राचार्य डॉ. डी. आर. महाजन, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. अनिल पाटील, विविध शाखेचे विभाग प्रमुख, विभागाचे प्लेसमेंट अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले. प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.डी.आर. महाजन, यंत्र विभाग प्रमुख डॉ.कांबळे, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.निखाडे, उपयोजित यंत्र विभाग प्रमुख डॉ.रंगारी, रसायन विभाग प्रमुख श्रीमती पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.