पादचाऱ्यांची वाट हरवली
ठाणे : फेरीवाल्यांसाठी धोरण, कर्ज योजना अशा कल्याणकारी योजना ठाणे महापालिका एकीकडे राबवत असताना दुसरीकडे फेरीवाल्यांनी थेट पदपथावरच अतिक्रमण केले आहे तर रस्त्याकडील दुकाने आणि गाळ्यांनीही थेट पदपथावरच छत्र्या लावून पदाचाऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत.
ठाणे महापालिका हद्दीत शहराबाहेरील फेरीवालेही येऊन अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे ठाणे शहरात विशेषतः नौपाडा आणि स्टेशन परिसरात फेरीवाल्यांची संख्या बेसुमार वाढलेली दिसत आहे. फेरीवाल्यांनी पदपथ अडवल्याने नागरिकांना पदपथावरून चालणे दुरापास्त झाले असताना आता रस्त्याच्या कडेला असलेली खाऊची दुकानेही पदपथापर्यंत त्यांचा संसार आणून नागरिकांची वाट अडवू लागले आहेत.
तलावपाळीजवळ नौकाविहार समोरील पदपथही दुकानांनी व्यापून टाकल्याने स्टेशनकडून आलेल्या नोकरदारांना घरी पोहोचताना तारेवरची कसरत करावी लागते. येथील भेळपुरी, पाणीपुरी आदी खाऊची छोटी-छोटी दुकाने जागेअभावी त्यांची टेबले पदपथावर मांडत आहेत, एवढेच नव्हे तर ग्राहकांना बसण्यासाठी पदपथावरच छत्र्या आणि खुर्च्या मांडत आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथ सोडून रस्त्यातून चालावे लागते. यात लहान-सहान अपघातांची शक्यता अधिक असल्याने चाकरमान्यांच्या डोक्यावर नेहमीच टांगती तलवार असते.
नौपाडा भागात फेरीवाले आणि अशा दुकानांचा नाहक त्रास नागरिकांना होत असतो. याबाबत असंख्य तक्रारी होऊनही पालिका प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही, असे येथून नेहमी जाणाऱ्या चाकरमान्याने सांगितले.
गणपती मंदिर ते ठाणे रेल्वे स्टेशन, सॅटिस परिसर, गोखले रोड आदी ठिकाणीही फेरीवाल्यांनी पदपथ व्यापल्याने पादचारी हैराण झाले आहेत. ठामपा हद्दीतील सुमारे साडेपाच हजार फेरीवाल्यांची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात ही संख्या दहा हजारावर आहे. नोंद झालेल्या फेरीवाल्यांपैकी फक्त १२४३ फेरीवाल्यांना कागदपत्रे सादर करता आली आहेत. या फेरीवाल्यांसाठी कल्याणकारी योजना पालिका राबवत असताना पदपथ व्यापून नागरिकांना नाहक त्रास देण्याचे फेरीवाले थांबवत नाहीत.
या फेरीवाल्यांकडून आणि रस्त्याकडील दुकाने आणि गाळ्यांकडून रोजचा हप्ता जात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप पादचाऱ्यांकडून केला जात आहे. याबाबत नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.