विवाह संकेतस्थळावर निवडलेला वर मुलगा ११ लाखांना पडला

ठाणे : नोकरी करणा-या एका युवतीने विवाहासाठी लग्नसंस्थेच्या स्थळावर नाव नोंदवले. बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख दिलेल्या पुणेकर तरुणाची निवड तिने केली. फोनवरून संवाद वाढला, परिचयही वाढला. दरम्यान वर मुलाने सुशिक्षित नोकरदार मुलीचे तब्बल ११ लाख रुपये लुबाडले. ही घटना वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

भास्कर शिर्के असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने माझी ट्रेडिंग कंपनी आणि बांधकाम व्यवसाय असल्याची सपशेल लोणकढी सांगितली. ‘त्या’मुलीला त्याने चांगलेच गंडवले. तिने फोनवर संभाषण करत असताना भास्करने व्यवसायासाठी ४० हजार रुपये मुलीकडे मागितले. आपला विवाह ‘त्यांच्याशी’होणार असल्याने विश्वासाने तिनेही ऑनलाईन पैसे भास्करला सुपूर्द केले.

जानेवारीत ओळख झालेल्या भास्करने या तरुणीकडून वेगवेगळी कारणे सांगितली. सुरुवातीस, पाच हजार रुपयांवरुन काही दिवसांतच ५० हजार रुपये मागितले आणि तीनेही आपला हा जीवनसाथी होणार असल्यामुळे तब्बल ११ लाख रुपये दिले. मात्र काही दिवसांतच तिचे डोळे उघडले. आपली फसवणूक झाल्याचे तिला उशीराने समजले. तिने मग वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून भास्करला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली. भास्करला पकडण्यासाठी पोलिसांनी सर्व बँक डिटेल्स आणि त्याचे मोबाईल लोकेशन तपासले आणि मोठ्या कौशल्याने नांदेडमधून अटक केली आहे. वागळे पोलिसांनी भास्करला ‘चौदावे रत्न’ दाखवल्यानंतर स्वत:च्या मौजमजेसाठी त्याने सर्व पैसे उधळले असल्याचे सांगितले. या तरुणीबरोबर आणखी काही तरुणींना गंडा घातला असल्याचा संशय पोलिसांना आहे.

विवाह संकेतस्थळावर नाव नोंदवताना मुलगा किंवा मुलीची संपूर्ण माहिती घेऊन पुढील प्रक्रिया करावी. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मुला-मुलींची कौटुंबिक माहिती, त्यांची पार्श्वभूमी याची सखोल माहिती मिळाल्यानंतर एकदातरी स्वत: किंवा नातेवाईक/मित्रपरिवार यांच्यामार्फत समक्ष भेट घेणे गरजेचे आहे, असा सल्ला वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिला आहे.