स्वच्छ सर्वेक्षण संपले आणि सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला

नवी मुंबई मनपाचे दुर्लक्ष, लाखोंचे नुकसान

नवी मुंबई: स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये देशात प्रथम येण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून शहरात करोडो रूपये खर्च करण्यात आले, मात्र सर्वेक्षण संपताच पालिकेने दुर्लक्ष केले आणि सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजल्याचे उघडकीस आले आहे.

स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम येण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेकडून शहरात करोडो रूपये खर्च करून सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली. यासाठी शहरातील चौकाचौकात, मुख्य प्रवेशद्वारावर व्हर्टिकल गार्डन उभारण्यात आली. याचा परिणाम म्हणजे नवी मुंबई महानगर पालिकेला काही महिन्यांपूर्वी देशात तिसरा क्रमांक मिळाला. मात्र सध्या शहरातील स्थिती पाहिल्यावर महानगरपालिका प्रशासनाने सुशोभिकरण केलेल्या जागांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यामुळे लाखो रूपये खर्च करून उभा करण्यात आलेली व्हर्टिकल गार्डनमधील झाडे सुकून गेली आहेत. अनेक ठिकाणी तर यातील कुंड्या सुध्दा गायब झाल्या आहेत. त्यामुळे पारितोषिक मिळाल्यावर केलेला खर्च वाऱ्यावर सोडायचा का असा सवाल उपस्थित होत आहे.