उल्हासनगर : हॅन्ड ब्रेक लावून चालक हा खाली उतरल्याने आपोआप सुरू झालेल्या बसने चालकाविना प्रवास करून विद्युत पोलला धडक दिली. तसेच तीन गाड्यांचे नुकसान करून ही बस एका घरावर आदळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.
तलरेजा ट्रॅव्हल्स ही बस तक्षशिला शाळेतील सहलीसाठी आणण्यात आली होती. ही बस सुभाष टेकडी परिसरातील महात्मा फुले रोडवर उतारावर उभी करून आणि हॅन्ड ब्रेक लावून चालक खाली उतरला. मात्र आपोआप सुरू झालेल्या या बसने काही अंतरापर्यंत चालकाविना प्रवास करून तीन गाड्यांचे नुकसान करून विद्युत पोलला धडक देऊन एका घरावर आदळली.
सुदैवाने या बसमध्ये विद्यार्थी नसल्याने व ही बस खाली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या अनपेक्षित अपघाताप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून गाड्यांची नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी संबंधितांनी मागणी केली आहे.