ठाण्याची हवा अतिप्रदूषित; ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात

मेट्रोचे काम आणि वाहतूक कोंडीने हवेत रासायनिक वायू आणि धूळ वाढली

मुंबईपाठोपाठ ठाण्याचीही हवा बिघडली

ठाणे : ठाणे शहरात सुरू असलेल्या मेट्रोची कामे आणि वाहनांची वाढती वर्दळ यामुळे ठाण्याची हवा १०१.५५ टक्के प्रदुषित आढळली आहे. अतिप्रदूषित गटात ही हवा मोडत असून प्रदूषण नियंत्रण विभागाने लाल रंगाचा शेरा मारला आहे. मुंबईपाठोपाठ ठाण्याची हवा बिघडल्याने ठाणेकरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

तीन हात नाका परिसर अतिप्रदूषित गटात मोडला असून येथील हवा प्रदूषण १५४.७८ टक्के एवढी आढळून आली आहे. येथील हवेतील धुलीकणातही वाढ झाल्याचे दिसत आहे. या भागात सध्या वाहनांची वर्दळ वाढली असून तसेच या भागात मागील काही वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे, त्यामुळे येथील प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शहरातील महत्वाच्या १६ चौकांमधील प्रदूषणाची मोजणीही या अंतर्गत केली जाते. त्यानुसार शहरातील प्रदूषणाचे प्रमाण हे १०१.५५ टक्के आढळून आले आहे.

औद्योगिक परिसरातील रेप्टाकॉस ब्रेट अॅण्ड कंपनी अंतर्गत वागळे इस्टेट शास्त्री नगर आदी ठिकाणीही हवेतील प्रदूषणाही काहीसे वाढले असून येथे तर ६९.८३ टक्के हवा प्रदूषित आढळली आहे. तर निवासी परिसर असलेल्या कोपरी प्रभाग कार्यालय अर्थात रहिवास क्षेत्रातही हवा अतिप्रदूषित आढळली असून येथील हवेची गुणवत्ता १००.६७ टक्के आढळली आहे. व्यावसायिक परिसर असलेल्या शाहू मार्केट नौपाडा परिसरातील हवा देखील अतिप्रदूषित आढळली असून येथील प्रमाण हे ८०.९२ टक्के एवढे आहे.

प्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तापसण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल या रंगांचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अतिशुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध नारंगी रंगात प्रदूषित तर लाल रंग असलेला परिसर अतिप्रदूषित गटात मोडतो.