३० जुलैला सर सरसंघचालक
मोहन भागवत यांच्या हस्ते भूमिपूजन
आनंद कांबळे/ठाणे
ठाण्यातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे भूमिपूजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ३० जुलै रोजी होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
बाळकुम येथील ग्लोबल रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या सुविधा भूखंडावर कर्क रुग्णालयाची दुसरी इमारत बांधण्यात येणार आहे. पहिल्या इमारतीमध्ये देखील सर्व सुविधा असून येथे सुमारे ११०० बेड उपलब्ध होणार आहेत. हे रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी सज्ज असणार आहे. या रुग्णालयाच्या आवारात एक भव्य जैन मंदीर देखील निर्माण केले जाणार आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा देखील बांधली जाणार आहे. त्याचे देखील भूमिपूजन केले जाणार आहे. त्याकरिता ठाणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे.
या कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री मंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याने कार्यक्रमाची जय्यत तयारी शिवसैनिकांनी देखील सुरू केली आहे. पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना कामे वाटून देण्यात आली असल्याचे समजते.
ठाणे जिल्ह्यातील कॅन्सरग्रस्त रूग्णांना वेळेवर उपचार मिळावेत त्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आग्रही होते. त्यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे ठाणेकरांना कॅन्सर रुग्णालय मिळणार आहे. टाटा कॅन्सर रुग्णालय, जितो मेडिकल ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या भागीदारीत हे रुग्णालय चालवले जाणार आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात संपूर्ण भारतातील कर्क रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात, त्यामुळे या रुग्णालयावर प्रचंड ताण पडतो. कधी कधी रुग्णाला वेळेवर उपचार मिळत नाहीत. महाराष्ट्रात दुसऱ्या ठिकाणी कॅन्सर रुग्णालय नाही, त्यामुळे अनेक रुग्णांना खाशगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. हे रुग्णालय सुरू झाल्यानंतर गरिबांना येथे उपचार मिळतील आणि मुंबईतील टाटा रुग्णालयाचा भार कमी होऊ शकतो, असे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रुग्णालयाचे भूमिपूजन होणार होते, परंतु ते काही कारणास्तव झाले नव्हते. अखेर आता सरसंघचालक श्री. भागवत यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचेही तो अधिकारी म्हणाला.