आयआयटी क्रीडा महोत्सवात ठाणेकर बॅडमिंटनपटूंना ११ पदके

श्रुती भोईरला दुहेरी मुकुटाचा मान

ठाणे: २४ ते २६ मार्च दरम्यान पार पडलेल्या आय. आय. टी. मुंबईने पवई येथे आयोजित केलेल्या आवाहन क्रीडा महोत्सवांतर्गत खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेकर बॅडमिंटनपटूंनी ११ पदके मिळवली. यात पाच सुवर्ण, एक रौप्य आणि पाच ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे.

प्रतीक रानडे याने पुरुष एकेरीत फेरीच्या सामन्यात एकहाती विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्याचा सामना ठाणेकर खेळाडू सारांश गजभिये याच्याशी झाला. दीर्घकाळ रंगलेल्या या सामन्यात सारांशला ९-२१, २१-१४, २१-१९ असा पराभव स्वीकारून ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. ठाणे अकॅडमीच्या वेदांत जवंजाळ यालाही उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात पराभव स्वीकारून ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. तर अंतिम फेरीच्या लढतीत प्रतीक रानडे याने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून हर्ष शर्मा या आक्रमक खेळाडूला २१-१९, ११-२१, २१-१२ असे नमवून सुवर्ण पदक निश्चित केले.

महिला एकेरीत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या श्रुती भोईरने उत्तम खेळाचे करत उपांत्य फेरी गाठली. तिथे तिचा सामना ठाणे अकॅडमीच्याच अपर्णा बने हिच्या सोबत झाला. श्रुतीने २१-४, २१-८ अशा सरळ सेटमध्ये अपर्णाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली तर अपर्णाला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीच्या लढतीत सेकंड सीडेड संप्रती पाथरबे हिच्या सोबत श्रुतीने सुरेख खेळ करत २३-२१, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये सामना जिंकला व सुवर्ण पदकाला गवसणी घातली.

पुरुष दुहेरीत अथर्व जोशी आणि सारांश गजभिये तर प्रतीक रानडे आणि शुभम पाटील यांच्यात रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रतीक आणि शुभम यांनी २१-१९, २१-१८ अशी बाजी मारली त्यामुळे अथर्व जोशी व सारांश गजभिये यांना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत राज्य अजिंक्यवीर जोडी विराज कुवाले आणि विप्लव कुवाले यांनी प्रतीक आणि शुभम यांचा २१-१४, २१-१९ असा पराभव करून अजिंक्यपदक मिळवले.

महिला दुहेरीत मानसी कारेकर आणि श्रुती भोईर यांनी उपांत्य फेरीत आन्या वर्मा आणि शार्वणी यांचा २१-११, २१-१४ असा सहज पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत काशिका महाजन आणि रितिका पालिएथ यांचा त्यांनी ८-२१, २१-१२, २१-६ असा पराभव करून सुवर्ण पदक प्राप्त केले. श्रुती भोईर हिने एकेरी आणि दुहेरी दोघांमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून दुहेरी मुकुटाचा मान देखील मिळवला आहे.

अथर्व जोशी यांच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केले आहे तर विराज कुवळेच्या संघाला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले आहे. अथर्वच्या संघात ठाणेकर प्रतीक रानडे आणि शुभम पाटीलचा समावेश होता आणि विराजच्या संघात विप्लव कुवळे आणि ऋतुराज राठोड याचा समावेश होता.

या विजयात ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड, मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर आणि विघ्नेश देवळेकर यांचा मोठा वाटा आहे असे शशांकने नमूद केले.