ठाण्यात रंगणार ‘आयपीएल’च्या संघांचा सराव

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहामध्ये खेळाडूंची उपस्थिती

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये आयपीएल स्पर्धेतील खेळाडू सराव करणार आहेत. या मैदानात येत्या १७ मार्च रोजी कोलकत्ता नाईट राईडर्स आणि आरसीबीचे खेळाडू सराव करणार असून त्यासाठी महापालिका प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात बीसीसीआयच्या नियमावलीनुसार मैदानाची खेळपट्टी नव्हती. यामुळे क्रीडा प्रेक्षागृहाची पांढरा हत्ती अशी हेटळणी करण्यात येत होती. ही ओळख पुसण्यासाठी पालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्याचाच एक भाग म्हणून नामवंत क्युरेटर नदिम मेमन यांच्या देखरेखीखाली पालिकेने आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळपट्टी तयार केली आहे. बीसीसीआयच्या नियमावलीनुसार ही खेळपट्टी तयार करण्यात आल्यामुळे या मैदानावर रणजी क्रिकेट सामने खेळविणे शक्य झाले.

नव्या खेळपट्टीमुळे २५ वर्षांनंतर विजय हजारे रणजी क्रिकेट सामने मैदानात पार पडले. त्यापाठोपाठ आता याच मैदानात आयपीएल स्पर्धेतील खेळाडू सराव करण्यासाठी येणार आहेत. यानिमित्ताने ठाणेकरांना भारतीय संघाबरोबर इतर देशाच्या संघातील खेळाडूंना पाहाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महापालिका प्रशासनाने खेळाडूंच्या सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याची तयारी सुरू केली असून त्याची पाहाणी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी केली.

आयुक्तांकडून आढावा

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहामध्ये कोलकत्ता नाईट राईडर्स आणि आरसीबीचे खेळाडू सराव करणार असून या पार्श्वभूमीवर तेथील व्यवस्थेचा आढावा आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतला. तसेच सरावासाठी मैदान सज्ज ठेवण्याच्या संबंधितांना सुचना दिल्या, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.