* रहेजा गृहसंकुलाजवळील
वळण रस्ता बंद करणार
* नागरिकांचा तीव्र विरोध
ठाणे: शहरातील वाहतूक बदल करण्याचा सपाटा लावणाऱ्या ठाणे महापालिकेने रहेजा गृहसंकुलाजवळ वाहनांसाठी वळण रस्ता बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या निर्णयास गृहसंकुलातील नागरीकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
ठाणे शहरात विविध भागात दुभाजक बसवून पालिका प्रशासन आणि वाहतूक शाखेच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा सपाटा सुरु आहे. यातील काही ठिकाणी स्थानिकांच्या रोषानंतर वाहतूक बदल मागे घेण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. तर अनेक रस्त्यांचे वाहतूक बदल प्रशासनाने रातोरात केले आहेत. त्यामुळे होणारी कोंडी पाहता रहेजा गृहसंकुलासमोरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाकडे एलबीएस मार्गावरून जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्याचा पालिकेचा प्रयत्न तूर्तास थांबवण्यात आला आहे. स्थानिकांचा रोष पाहता या परिसरातील माजी लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेत या कामाची पाहणी केली. दरम्यान, हा वळण रस्ता बंद केल्यास स्थानिकांची मोठी अडचण होणार असून या भागात कोंडी उदभवण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी सिग्नल यंत्रणा अथवा ट्रॅफिक वॉर्डन देण्याची विनंती पत्राद्वारे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना केल्याची माहिती रहेजा गृहसंकुल फेडरेशनचे अध्यक्ष महेंद्र सपकाळ यांनी दिली.
याबाबत रहेजातील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होताच आयुक्तांशी, वरीष्ठांशी याबाबत चर्चा केली असून त्यांनी चर्चा करून समस्येवर तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. लवकरच त्यांची भेट घेऊन तोडगा काढण्यात येईल, असे या भागाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले.
हाजुरी, रघुनाथ नगर, रहेजा गृहसंकुलाकडून येणाऱ्या वाहनांना मुलुंड चेकनाका, प्रादेशिक मनोरूग्णालयाकडे जाणारा वळण रस्ता बंद केल्यानंतर डावीकडे वळण घेऊन तीन हात नाक्याआधी दिलेला युटर्न घेऊन पुढे मार्गस्थ होता येईल. तर तीन हात नाका, प्रादेशिक मनोरुग्णलय येथून रहेजा गृहसंकुलाकडे जाणाऱ्या वाहनांना टिपटॉप प्लाझासमोर वळण देण्यात आले आहे. तेथून ही वाहने पुढे जाणार असल्याने अत्यंत महत्वाच्या अशा या रस्त्यावर मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.