नवी मुंबई: मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ होत चालली आहे. सोमवारी देखील वाशीतील घाऊक बाजारात आवक कमी झाली. बाजारात ३२ गाड्या दाखल झाल्याने दरात वाढ झाली. घाऊकमध्ये प्रतिकिलो १००-११० रुपये तर किरकोळ बाजारात दीडशे पार केली असून प्रतकिलो १६० रुपयांपर्यंत गेल्याने टोमॅटोच्या दराने नवीन उच्चांक गाठला आहे.
महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री होत होती. टोमॅटो शेतकऱ्यांचा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील निघत नव्हता. टोमॅटोला कवडीमोल दराने विक्री करावी लागत असल्याने शेतकरी हताश झाले होते. त्यामुळे या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन लागवड, उत्पादन घेण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी सध्या उत्पादन कमी होत असून राज्यातील टोमॅटो आवक रोडावली आहे. त्यामुळे मागणी अधिक आणि टोमॅटोची टंचाई भासत आहे.
मागील आठवड्यात घाऊक बाजारात ७५ ते ८५ रुपये तर आता घाऊक बाजारातच शंभरी पार केली आहे. किरकोळ बाजारात दीडशे रुपये किलोने उपलब्ध असलेले टोमॅटोचे अजूनही कडाडले आहेत. त्यात आणखी १० रुपयांनी भर पडली असून किरकोळ बाजारात प्रतकिलो १६० रुपयांनी विक्री होत आहे.