बदलापूर : भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासनाने श्वान निर्बिजीकरण मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी श्वान निर्बिजीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र या केंद्रात काही कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने तूर्तास तात्पुरत्या स्वरूपात श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
बदलापुरात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. नागरिकांच्या या मागणीची दखल घेऊन नगर परिषद प्रशासनाने श्वान निर्बिजीकरणला सुरुवात केली आहे. ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेला दोन वर्षांसाठी हे काम देण्यात आले असून यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च होणार आहेत. श्वान निर्बिजीकरण मोहिम प्रभावीपणे राबविली जावी यासाठी बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात मोहपाडा येथील पाण्याच्या टाकीजवळच्या प्रशस्त जागेत श्वान निर्बिजीकरण केंद्रही उभारण्यात आले आहे. मात्र या केंद्रात अद्याप काही कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सध्या बदलापूर पश्चिम भागात बीएसयुपी घरकुल योजनेच्या एका इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात छोटेखानी श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
सुमारे तीन आठवड्यांपासून हे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू झाले आहे. सध्या या केंद्रात ३० भटके कुत्रे असून आतापर्यंत ६० भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कात्रप येथील निर्बिजीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास आठवड्याभरात सुमारे ५० -६० श्वानांचे निर्बिजीकरण करणे शक्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रतिक्रिया:
कात्रप मोहपाडा येथे श्वान निर्बिजीकरण केंद्र बांधण्यात आले आहे. मात्र येथे वीज जोडणी उपलब्ध झालेली नाही. त्याशिवाय फ्लोअरिंग व वायरिंगचे कामही पूर्ण झालेले नाही. ही कामे पूर्ण होताच येथे श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे.
वैशाली देशमुख
आरोग्य विभाग प्रमुख: कुळगाव बदलापूर नगर परिषद