‘किलकारी’ घेणार गरोदर मातांची काळजी

२६ हजार मातांना मिळणार लाभ

ठाणे: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या व एक वर्षापर्यंतच्या बालकांच्या सुरक्षेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशासेविकांसाठी मोबाईल अकादमी राज्यात सुरू करण्यात येणार आहे.

महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासावर केंद्र व राज्य शासनाचा भर आहे. गर्भवती व प्रसूत महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. किलकारी योजना देशातील १८ राज्यांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातील सुमारे २८ लाख नोंदणीकृत गरोदर मातांना योजनेचा लाभ होणार आहे. असून जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत देखील ‘किलकारी’ या नवीन योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली आहे.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेला गावातील आरोग्यसेविकाद्वारे आर.सी.एच पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर) आधारित मोबाइल आरोग्यसेवा आहे. गर्भधारणा, बाळंतपण आणि बाल संगोपन विषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक रेकॉर्डेड ऑडियो कॉल करण्यात येतील. ऑडियो कॉल चुकल्यास किंवा त्या आठवड्यातील ऑडियो कॉल पुन्हा ऐकायचा असल्यास नोंदणीकृत १४४२३ या मोबाईल क्रमांकाद्वारे संपर्क करता येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता २६,३३३ गर्भवती महिलांची नोंद आहे. दर महिन्याला हजारपेक्षा जास्त गर्भवतींची नोंद होते. आशासेविकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मोबाईल अकादमी देखील सुरु करण्यात येणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यास व परिक्षा पास झाल्यास आशासेविकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याद्वारे ठाणे जिल्ह्यातील ११२३ आशासेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आशासेविका यांच्यासाठी नोंदणीकृत १४४२९ दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच किलकारी सेवा देण्यासाठी येणारा दूरध्वनी क्रमांक ०१२४-४४५१६६० असेल.