रस्ता रुंदीकरण आणि विकासकामांमुळे झाडांची कत्तल
ठाणे: एकेकाळी शहरात अनेक रस्त्यांवर दुतर्फा दाट झाडांच्या कमानींमुळे पादचारी, वाहनचालकांना कडक उन्हाळाही सुसह्य व्हायचा, पण आता विकासकामांमुळे झाडांबरोबर सावल्याही अदृश्य झाल्या. त्यामुळे सावलीसाठी ठराविक चौकांत हिरव्या आच्छादनांचे मंडप उभे करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे.
गेल्या काही दिवसांत उन्हाची तीव्रता वाढत असून प्राणीमात्रांना त्याची झळ बसू नये म्हणून महापालिकेने काही उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. सिग्नल चौकात हिरव्या कापडाचे आच्छादन हा त्यापैकीच एक उपाय. याचा फायदा भर उन्हात हिरव्या सिग्नलची वाट पाहणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात होत असला तरी झाडांची जपणूक केली असती तर ही पाळी ठाणेकरांवर आली नसती, असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान वाढते शहरीकरण, रस्ता रुंदीकरण तसेच सिमेंट काँक्रीटीकरणामुळे ठाणे शहरातील नैसर्गिक हिरवी आच्छादने हरपली आहेत. या विकासकामांमुळे शहरातील रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्यामुळे रखरखत्या उन्हात प्रवास करणाऱ्या ठाणेकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत.
महानगरपालिकेने ६० सेकंदांपेक्षा जास्त वेळ असलेल्या सिग्नल परिसरात कृत्रिम सावलीची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये तीन हात नाका, आल्मेडा चौक, खोपट, नितीन कंपनी या सिग्नलवर सहा ठिकाणी हिरव्या कापडांचे मंडप उभारले आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात ६,३६७ झाडे असून त्यामध्ये गुलमोहर, रातराणी, पिंपळ, अशोक, बदाम अशा विविध प्रकारच्या वृक्षांचा समावेश आहे. शहरात अनेक रस्ते बकाल झाले असताना चरई, महापालिका मुख्यालय परिसर, उपवन, मासुंदा तलाव पाळी परिसर, नितीन कंपनी सिग्नल, कॅडबरी सिग्नल, तीन हात नाका सिग्नल परिसरातील सेवा रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल रोड, जेल रोड, मनिषा नगर, कावेरी सेतू, वसंत विहार अशा अनेक रस्त्यांवर दुतर्फा लावलेल्या झाडांमुळे नागरिकांना गार सावली मिळत असून रस्त्यांनाही शोभा आली आहे.
आगामी काळात उष्णतेचा पारा सातत्याने वाढत जाणार असल्याचे पर्यावरण तज्ञांचे अंदाज आहेत. त्यामुळे बकाल रस्त्यांवर दुतर्फा सावली देणारी झाडे लावावीत, त्यामुळे किमान पुढील पिढीला त्याचा फायदा होईल, अशी मागणी जोर धरू लागली आहे.