ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
ठाणे : विद्यार्थ्यांनी अवकाश निरीक्षण छंद म्हणून नाही तर संशोधन म्हणून हाती घेणे गरजेचे आहे, ज्याद्वारे देशाच्या विकासात आपले योगदान देता येईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील किसननगर येथील आदर्श इंग्लिश स्कुलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाट्न झाले. त्यावेळी काशिनाथ देवधर बोलत होते.
आदर्श इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांसोबत इतरही शाळेच्या विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ घेता यावा, असे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेंकेल अधेसिव्हज टेक्नॉलॉजिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या अवकाश निरीक्षण केंद्राचे उदघाट्न समारंभी ज्येष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर, हेंकेल इंडियाचे मुख्य आर्थिक अधिकारी कृष्ण प्रकाश, मीरा कोर्डे, प्रसाद खंडागळे, आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, कार्यकारी विश्वस्त श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे, हेंकेल इंडियाचे सीएसआर सदस्य कुंजल पारेख व संदीप पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसाद खंडागळे यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध प्रयोग कसे करता येईल याबाबतचे मार्गदर्शन करत असताना यापूर्वी सुरु झालेल्या 12 अवकाश निरीक्षण केंद्रामधील मिळत असलेल्या यशाचा आढावा घेतला.
हेंकेल इंडिया विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे मत कृष्ण प्रसाद यांनी व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी हेंकेल इंडियाचे आभार मानत असताना सुरु झालेल्या या अवकाश निरीक्षण केंद्राचा लाभ ठाणे शहरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होईल याची हमी दिली. विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे शहरातील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना या अवकाश निरीक्षण केंद्राची भेट व त्यावर आधारित अभ्यासक्रमासाठी नोंदणी करता येईल असे सांगितले.
हेंकेल इंडियाचे संदीप पेटकर व विशाल कुंभार यांनी या केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहिले. तसेच ट्रेन दे ट्रेनर या संकल्पनेनुसार शिक्षकांना अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल व त्यामध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता येईल, असे मत व्यक्त केले.