शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री

ठाणे : शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळ यांच्या डी.एल.बी. डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करियर गाईडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय, अशी विविध महाविद्यालये सुरु होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे पुण्य काम या संस्थेतून होत आहे, असेच चांगले काम करीत राहा, शासन आपल्या पाठीशी निश्चित उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिध्द आरजे अमित काकडे यांनी केले तर विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.