* राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठाणे जिल्हा राज्यात प्रथम
* ३० वर्षे जुनी प्रलंबित प्रकरणे निकाली
ठाणे : ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण 131 प्रकरणे तसेच डेबट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची 137 प्रकरणे सामंजस्याने मिटल्याने, त्यातील कुटुंबियांना व वारसांना त्वरीत नुकसान भरपाई मिळालेली आहे.
या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अत्यंत जुनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पाच वर्षे, १० वर्षे, २० वर्षे व ३०वर्षे जुनी असलेली एकूण ३१८ प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळाले. मोटार अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये दोन कोटी दोन लाख रूपयांची तडजोड झाली. ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण १३१ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. एकूण १४ कोटी ४० लाख ३८ हजार रूपयांची तडजोड करण्यात आली. डेबट्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाद्वारे १३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात ३९ कोटी २४ लाख ४१,१३३ रुपये रकमेची तडजोड झाली.
वैवाहीक वादाच्या एकूण ६१ प्रकरणांमध्ये यशस्वी समेट करण्यात आला. त्यापैकी १० प्रकरणांत पती-पत्नी एकत्र नांदावयास गेले. धनादेश प्रकरणांतील जुनी प्रलंबित ६८५ प्रकरणे निकाली काढून त्यात १० कोटी ७७ लाख ६७३ रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास २१,४०९ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबुल करून दंडाची रक्कम एक कोटी पाच लाख ४९ हजार रुपये जमा केली. प्रॉपर्टी टॅक्स/रेव्हेन्युची दाखलपूर्व ६०,४०९ प्रकरणे निकाली निघाली. त्यात दोन कोटी १० लाख ६८,९६७ रुपये रकमेची तडजोड करण्यात आली.