एस.टी महामंडळ तब्बल २००० डिझेल बसगाड्या खरेदी करणार

निविदा काढल्याने पुन्हा ‘अच्छे दिन’

ठाणे : एस.टी महामंडळाने स्वमालकीच्या तब्बल दोन हजार डिझेल बस गाड्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याकरीता निविदा काढल्या आहेत.

प्रवासी नाही म्हणून उत्पन्न नाही, उत्पन्न नाही, म्हणून नव्या बसेस्चा ताफाच नाही, अशा चक्रात महामंडळ सापडले होते. पण डिझेल बसगाड्या खरेदी करण्याच्या निर्णयामुळे प्रवासी संख्या वाढेल, प्रवासी वाढल्याने एस.टी.चे उत्पन्न वाढून पुन्हा ‘अच्छे दिन’येतील, असा विश्वास एस.टी.च्या एका वरिष्ठ अधिका-याने व्यक्त केला.

महामंडळाने शुक्रवारी ११ मीटर लांबीच्या बसगाड्यांसाठी निविदा काढल्यामुळे त्याच्या चासिस खरेदी करुन त्यावर नव्या बसेसची बांधणी केली जाणार आहे. यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या नियोजित बसगाड्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरण्याची तयारी महामंडळाने केली आहे. या सांगाड्यावर (चासिस) नव्या बसेसची बांधणी करताना प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था, मोबाईस चार्जर आणि अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.

प्रदूषण नियंत्रणासाठी आणि इंधन बचतीकरीता एस.टी.ने आपल्या ताफ्यात तब्बल 5150 इलेक्ट्रीक बसचा आणि 1000 सीएनजी बसगाड्याही घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या इलेक्ट्रीक बस भाडेतत्वावरील असणार आहेत तर सीएनजी बसची खरेदी न करता महामंडळाच्या बसमध्ये सीएनजी किट बसविण्याची योजना एस.टी.चे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची आहे, अशी माहिती एस.टी.च्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

पूर्वी महामंडळाकडे 18 हजार बसगाड्यांचा ताफा होता. पण महामंडळ तोट्यात असल्याने गेली अनेक वर्षे नव्या बस गाड्यांची खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संचित तोटा 11 हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.

करोना आणि ऐन दिवाळीत कर्मचा-यांंनी केलेला संप लांबल्यामुळे दिवाळी व उन्हाळी हंगाम वाया गेला. त्यामुळे प्रवासीविना महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. एसटी महामंडळाने दुरावलेले प्रवासी पुन्हा मिळविण्यासाठी काळानुसार एसटीच्या सेवेत बदल करण्याची नितांत गरज आहे आणि दोन हजार डिझेल बस गाड्यांची निविदा प्रक्रियाही वा-याच्या वेगाने पूर्ण करावी, अशी प्रतिक्रिया ‘एसटी कर्मचारी काँग्रेस’चे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दै.‘ठाणेवैभव’ला दिली.