नरेश म्हस्के यांचा विरोधकांना सवाल
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले वचन पाळले असून १० टक्के आरक्षण दिले आहे. याबाबत विरोधी पक्षांची दुटप्पी भूमिका आहे. दिलेले आरक्षण विरोधकांना पटत नसेल तर आरक्षणाचे अन्य काय मार्ग आहेत हे त्यांनी जाहीर करावे, की ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी विरोधकांची भूमिका आहे? हे देखील जाहीर करावे, असे आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांना दिले आहे.
विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले आहे. मात्र या आरक्षणाबाबत शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. हे आरक्षण फसवे आहे, हे आरक्षण टिकणार नाही, हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
सभागृहात जेव्हा आरक्षण मंजुरीसाठी आले तेव्हा एकमताने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी विरोधी पक्षातील एकाही नेत्याने आरक्षणाला विरोध केला नाही. सभागृहाच्या बाहेर मात्र आरक्षणासंदर्भात विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. ही विरोधकांची दुटप्पी भूमिका असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हस्के म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांच्या नेतृत्वाखाली हे आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण चुकीचे असेल तर एवढी वर्षे सत्तेत असलेल्या शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करावे. पवार यांनी एवढी वर्षे आरक्षणासाठी काय केले, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
२२ राज्यात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे हे आरक्षण टिकणारे असल्याचे त्यांनी सांगितले. तर संजय राऊत यांची मांडवली भाषा असून भांडुप आणि कांजूरमार्गमध्ये कोणाचे गुंड आणि कोणाच्या टोळ्या आहेत ते विचारा असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही म्हस्के यांनी टीका केली आहे. जेव्हा फिरायला हवे होते तेव्हा फिरले नाहीत. संघटना काँग्रेसच्या दावणीला बांधली. केवळ माझे कुटुंब असा विचार करत बसले. त्यामुळे आता वेळ निघून गेली असून आता फिरून काही उपयोग होणार नसल्याचा टोला म्हस्के यांनी लगावला.
सत्तेत असताना आरक्षणासाठी काय प्रयत्न केले असा प्रश्न विचारत सुप्रिया सुळे यांचा देखील आरक्षणाला विरोध होता असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. न्यायालयात आरक्षणासंदर्भात भाषांतराचे पेपर देखील देऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.