ठाणे-पालघर जिल्ह्यातील रुग्णवाढ चिंताजनक
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात आता दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. त्यात ठाणे-पालघरसह सहा जिल्ह्यातील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला पत्र पाठवत या जिल्ह्यात चाचण्या, लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा असा सल्ला दिला आहे. केंद्राचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांना पत्र पाठवले आहे.
कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने केंद्रिय आरोग्य विभागाने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे, असे पत्रात नमूद केले आहे. या जिल्ह्यात चाचण्या, लसीकरण वाढवणे यावर अधिक भर द्यावा. तसेच नवीन कोरोना व्हेरियंट यावर लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.
राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळेच टास्क फोर्स पुन्हा एकदा कार्यरत झाले आहे. टास्क फोर्सचे सदस्य राहुल पंडित यांनी कोरोनाला रोखण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. महाराष्ट्रात 1000 पेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळतात. मुंबईत सुद्धा सातशेच्यावर दैनंदिन रुग्णसंख्या आहे. यातील गंभीर रुग्ण नेमके किती आहेत आणि त्यांना त्यानुसार उपचार द्यायला हवेत. मात्र, सध्यातरी जे रुग्ण आढळतात त्यातील बहुतांश रुग्ण हे माईल्ड आहेत. आता नव्याने वाढणारी रुग्ण संख्या कमी करायची असेल तर मास्क वापरायलाच हवा. ज्या ठिकाणी बंदिस्त ठिकाणे आहेत, तिथे गर्दी असेल, जसे की ऑफिस, सभागृह येथे मास्क वापरणे आवश्यक आहे. शिवाय, कोरोनाची वाढत्या रुग्णसंख्या बघता वयोवृद्ध, हाय रिस्क पेशंट, डायलिसिसवरील रुग्ण यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, त्यांना सर्वाधिक धोका आहे. मास्क आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी वापरण्याची सवय लावणे गरजेचे आहे. कमीत कमी आपल्या सुरक्षेसाठी तरी मास्क वापरा. काही दिवसांत पावसाळा सुरु होतोय. त्यामुळे हंगामी रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन निदान करणे गरजेचं आहे.