श्रीकांत वाड यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

ठाणे: ठाणे बॅडमिंटन प्रशिक्षण अकादमीचे प्रमुख श्रीकांत वाड यांना २०१९-२० या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 असे तीन वर्षांचे पुरस्कार क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

१९८८ साली ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सुरू केलेल्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचा आज वटवृक्ष झाला असून त्याचे श्रेय श्रीकांत वाड यांना जाते. बॅडमिंटन प्रशिक्षक म्हणून १० छत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू आणि अनेक राष्ट्रीय विजेते, ३४ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तर शेकडो राज्य विजेते खेळाडूंची जडणघडण श्री.वाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

आशियाई बॅडमिंटन संघटनेमध्ये बॅडमिंटन खेळाचा विकास करणारे आजवरचे ते एकमेव भारतीय तज्ञ आहेत. या खेळाच्या आजवर शेकडो जिल्हास्तरीय, २१ राज्य अजिंक्यपद तर सहा राष्ट्रीय स्पर्धा श्री.वाड यांनी संघटक या नात्याने आयोजित केल्या आहेत. जिल्हा संघटनेचे २५ वर्षे सचिव पद आणि १० वर्षे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा धोरणाच्या मसुद्यावर, राज्य क्रीडा परिषदेवर आणि विविध राज्य शासन पुरस्कारांच्या निवड समितीवर त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून मानाचा दादोजी कोंडदेव पुरस्कार २००३ सालीच प्रदान केला आहे.

आज त्यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार घोषित झाल्यानंतर ठाण्यातील क्रीडा वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.